|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आगळगावच्या शेतकऱयाने द्राक्षे ओढय़ात फेकली

आगळगावच्या शेतकऱयाने द्राक्षे ओढय़ात फेकली 

प्रतिनिधी/ कवठेमहांकाळ

   पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर तक्रार कोणाकडे करायची असे नेहमी म्हटले जाते. हीच परिस्थिती आज द्राक्ष उत्पादक शेतकरी व लहानमोठय़ा शेतकयांवर आली आहे. सततच्या पावसामुळे द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानीला धैर्याने तोंड देणाऱया आगळगाव येथील शेतकऱयाने लाखो रुपयांची द्राक्षे चक्क ओढय़ात टाकली. नुकसान झाले म्हणून रडत बसण्यापेक्षा आलेल्या संकटाला धैर्याने या बहाद्दर शेतकऱयाने तोंड दिले.

   कवठेमहांकाळच्या पूर्वेला आगळगाव हे गाव असून या गावात द्राक्षबागांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. अनेक शेतकरी द्राक्षबागेकडे वळला आहे. इतकेच काय या गावातील सुशिक्षित तरुणही द्राक्षबागेकडेच आकर्षित झाला असून गावातील पुढारीसुद्धा नामांकित द्राक्ष बागायतदार आहेत. संजय मधुकर काकडे यांनी मोठय़ा कष्टाने द्राक्ष बाग लावली होती. मात्र गेल्या तीन ते चार महिन्यात सततचा पाऊस कोसळल्याने त्यांची द्राक्ष बाग हातातून गेली. सध्या जेवढी द्राक्ष फळे बागेत होती ती सर्व फळे एका ट्रक्टर ट्रॉलीमध्ये घातली आणि धो-धो वाहणाया ओढय़ात सोडून दिली.

    कवठेमहांकाळ तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून द्राक्षबागांकडे शेतकऱयांचा कल आहे. अगदी दुष्काळासारखे संकट समोर आले तरी हे बहाद्दर शेतकरी टँकरद्वारे द्राक्षबागांना पाणी देतात. कमरेला पैसा असो अथवा नसो महागडी औषधे द्राक्ष बागांवर फवारतात. अगदी पोटाच्या मुलांपेक्षा द्राक्षबागांवर बळीराजा प्रेम करतो कारण याच बागेच्या माध्यमातून शेतकरी आपले भविष्य बघतो. मात्र यंदा शेतकरी पूर्ण आर्थिक संकटात सापडला आहे.

   संजय काकडे, व्यंकटराव पाटील, कृष्णा मोहिते, सुभाष जाधव, सुखदेव नाईक, विजय जाधव, प्रकाश पाटील, प्रकाश पवार, विशाल पाटील, भारत निकम, श्रीकांत जगनाडे, राजू माने, शितल निकम, तात्या माने, अंकुश पाटील यांच्या शेतीचे तसेच द्राक्षबागेचे अतोनात नुकसान झाले आहे. या शेतकऱयांना आधार देण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्यासाठी राज्यातील विविध सामाजिक संस्था, मंदिरांच्या ट्रस्ट यांनी पुढे आले पाहिजे अशी विनंती ह्या भागातील शेतकरी करत आहे.

Related posts: