|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मगरींचा वावर वाढल्याने ‘कृष्णा काठ’ भयभीत

मगरींचा वावर वाढल्याने ‘कृष्णा काठ’ भयभीत 

शेतकरी, कोळी, पाणीपुरवठा कर्मचाऱयांमध्ये भिती

वार्ताहर/ वाळवा

येथील कृष्णा नदीचा घाट मगरीच्या भितीने सुनसान झाला आहे. एक मोठी मगर नदीत सावज शोधत फिरत आहे. नदीवर धुणे धुण्यासाठी येणाऱया महिला, दिवाळी सुट्टीसाठी आलेली मुले, जनावरे धुण्यासाठी येणारे शेतकरी, मासे धरणारे कोळी यांच्यामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. वन खात्याचे अधिकारी, कर्मचाऱयांनी या मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरीक करीत आहेत.

 मगरीने कृष्णा नदीकाठावर आतापर्यंत डिग्रज, आमनापूर, भिलवडी, औदुंबर, नागठाणे, तुंग येथील सहा ते सात जणांचा बळी घेतला आहे. परंतू याबाबीकडे कोणी गांभिर्याने पाहिले नाही.  वाळवा व शिरगाव नदी परिसरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मगरींचा वावर वाढला आहे. शिरगावच्या सिद्धेश्वर मंदिराच्या नजीक असलेल्या नदीकाठावर गवतामध्ये ही मगर ऊन खात असलेली अनेकदा अढळून आली आहे. नदीकाठावर धुणे धुण्यासाठी येणाऱया महिला, जनावरे धुण्यासाठी शेतकरी व पोहण्यासाठी मुले व नागरीक यांच्यात दहशतीचे वातावरण आहे.

 कृष्णा काठावर अनेकांचे बळी जावून ही वनखात्याचे अधिकारी दुर्लक्षीत करीत असल्याचे बोलले जात आहे. तसेच जिल्हा प्रशासनही गांभिर्यहीन असल्याने या निर्ढावलेल्या प्रशासनाला जागे करण्याची वेळ आली असून लोक आता मगरींच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरतील, अशी प्रतिक्रिया वाळवा येथील सामाजिक कार्यकर्ते माणिक पाटील, देवदास भंडारे यांनी दिली. वाळवा येथे मातीला गेलेल्या अनेक लोकांना हाळभाग आणि परिसरामध्ये ही मगर बऱयाचदा दिसून येत आहे. दररोज तिचे दर्शन लोकांना होत आहे. त्यामुळे कृष्णा नदी काठावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या दिवाळीची सुट्टी आहे आणि नदीवर पोहायला येणाया लोकांची संख्या देखील मोठी असते, पाहुण्यांच्या गावी आल्यानंतर पोहायला शिकणारी मुले, शाळेला सुट्टी असल्यामुळे नदीवर येणारी मुले यांचीसुद्धा मोठी अडचण सध्या होऊन बसलेली आहे.

 वाळवा येथील हाळभाग, कोठभाग, शिरगावचा पानवठा या सर्व पाणवठय़ावर  कोणीही व्यक्ती नदीकाठावर किंवा शेतीकडे फिरकलेले नाहीत. सांगलीचे जिल्हाधिकाऱयांनी या प्रश्नी वनखात्याच्या अधिकाऱयांची तातडीची बैठक बोलावून त्यांना मगरीचा बंदोबस्त करण्याच्या सूचना कराव्यात असे आवाहन नागरीक करीत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनीसुद्धा मगरीचा प्रश्न म्हणजे मृत्यूची टांगती तलवार समजून या प्रश्नावर शासनाला दखल घ्यायला भाग पाडले पाहिजे परंतु तसे होताना दिसत नाही. या नदीकाठावर पाणीपुरवठा संस्थांच्या मोटारी चालू बंद करण्यासाठी पाणीपुरवठा संस्थेच्या कर्मचाऱयांना, शेतकऱयांना रात्री अपरात्री जावे लागते. गवतामध्ये लपून बसलेली मगर कधी कोणाच्या जीवावर बेतेल याचा नेम नाही. तरी या मगरींचा बंदोबस्त प्रशासनाने करावा, ही मागणी नागरीकांनी केली आहे.

Related posts: