|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अज्ञाताने माती हटवल्याने वाहतूक धोकादायक

अज्ञाताने माती हटवल्याने वाहतूक धोकादायक 

वार्ताहर/ ताम्हाने

कोसुंब-तुळसणी या मार्गावरील सांगवे येथील सप्तलिंगी नदीवरील पूल सध्या अखेरची घटका मोजत आहे. धोकादायक स्थितीमुळे या पुलावरुन अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला चर मारुन दगड मातीचा बांध घालण्यात आला आहे. मात्र गत आठवडय़ात अज्ञात व्यक्तीने पुलाच्या दोन्ही बाजूकडील दगड-माती बाजूला केल्याने हा मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे.

सांगवे गावातून वाहणाऱया सप्तलिंगी नदीवरील पुलाची अवस्था गेली अनेक वर्षापासून धोकादायक बनलेली आहे. दीड वर्षापूर्वी या पुलाला पायथ्यालगत मोठे भगदाड पडले होते. त्यामुळे हा पूल केव्हाही कोसळण्याची भिती वर्तवण्यात येत आहे. या ठिकाणी नवीन पूल उभारण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होत होती. प्रशासनाकडून या पुलाच्या केवळ उत्तरेकडील बाजूची दुरुस्ती करण्यात आली. तसेच धोकादायक स्थितीमुळे पुलाच्या दोन्ही बाजूला चर मारुन दगड-मातीचा बांध घालण्यात आला व पुलावरुन अवजड वाहतुक बंद करण्यात आली. त्यामुळे या पुलावरुन फक्त दुचाकी वाहतूक सुरु होती.

गत आठवडय़ात अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास पुलाच्या दोन्ही बाजूला असलेला दगड-मातीचा बांध हटवल्याने हा मार्ग सध्या धोकादायक बनला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला मारलेली चर प्रवाशांना धोकादायक ठरु नये. यासाठी चरीच्या बाजूने दगडमाती टाकण्यात आली होती. मात्र अज्ञात व्यक्तीने ही दगड-माती हटविल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. रात्री-अपरात्री या पुलावरुन प्रवास करताना या चरीत पडून अपघात घडण्याची शक्यता सध्या तीव्र बनली आहे. संबंधित विभागाने पुलाची धोकादायक स्थिती लक्षात येथील चर बुजवावी अथवा या ठिकाणी दगड-मातीचा बांध घालून अवजड वाहतूक थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

 

Related posts: