|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दापोलीत आता बचतगटांद्वारे पीतक्रांतीची चाहूल!

दापोलीत आता बचतगटांद्वारे पीतक्रांतीची चाहूल! 

शहर वार्ताहर/ दापोली

भातशेतीला कंटाळलेल्या कोकणातील शेतकऱयांना शेतीच्या नवीन वाटा दाखवण्याची जबाबदारी आता सर्व सरकारी यंत्रणेवर येऊन ठेपली आहे. त्याच अनुषंगाने दापोलीत यंदा महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदने बचतगटांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध गावांत हळद लागवडीला अर्थात नव्या पीतक्रांतीला चालना दिली आहे.

सध्या भातशेती विविध समस्यांच्या विळख्यात आहे. अपुरे मनुष्यबळ, वाढती मजुरी, वन्यजीवांकडून होणारे वाढते नुकसान आणि अनिश्चित पाऊसमान यामुळे कोकणात भातशेतीचे प्रमाण कमी होत चालले आहे. वरकसपाठोपाठ पाणथळीची शेतीदेखील ओसाड पडत चालली आहे. अशा भातखाचरांमध्ये तुलनेत कमी मशागतीची आणि वन्यजीवांकडून नुकसान न होणाऱया पीकाच्या शोधात सध्या शेतकरी आहेत. या अनुषंगाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उमेद अभियानाचे सहसंचालक नितीन माने यांच्या संकल्पनेतून कृषी क्षेत्रातील वेगळ्या वाटा शोधण्याचा निर्णय जिह्यात प्रत्येक तालुक्यातील उमेद टीमने घेतला होता. त्यानुसार दापोली तालुक्यात हळद लागवडीला चालना देण्याचे पावसाळ्यापूर्वी ठरविण्यात आले होते. यासाठी उमेदतर्फे बचतगटांना माहिती देऊन बचतगटांना मार्गदर्शन शिबिरेही आयोजित करण्यात आली. कोकण कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाचे डॉ. राजन खांडेकर, तसेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुनील खरात यांनी यासाठी मार्गदर्शनाची जबाबदारी स्वीकारली.

हळदीचे स्थानिक वाण एसके – 4 आणि सेलम याच्या साडे तीन टन बियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली. यामध्ये एस-4 वाणाचे एक टन आणि सेलमचे अडीच टन बियाणे वितरित करण्यात आले. यामध्ये एकत्रितपणे बियाणे खरेदी केल्याने प्रतिकिलो 55 रूपयांना ते उपलब्ध झाले. पावसाळ्यापूर्वी 16 गावांतील महिला बचतगटांना या बियाण्याचे वाटप करण्यात आले असून आगरवायंगणी, नवानगर, गोमराई, करंजाणी, म्हाळुंगे, दाभोळ आणि ओणी अशा गावांत हळदीची शेत डोलू लागली आहेत. उमेदच्या या प्रयत्नातून तालुक्यातील तब्बल साडे सहा एकर क्षेत्रावर हळदीची लागवड झाली आहे. विशेष म्हणजे महिला बचतगटांचा प्रतिसाद लक्षात घेता पुढील वर्षात या क्षेत्रात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पीकातील हा बदल जमिनीत पुढील पिकासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणार आहेच, पण मसाल्यातील हळदीची स्थानिक गरजही भागवणार आहे, असे तज्ञांचे मत आहे. 

 

Related posts: