|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पु.लं. म्हणजे सहवेदनेने घायाळ होणारे संवेदनशील लेखक : रेणू दांडेकर

पु.लं. म्हणजे सहवेदनेने घायाळ होणारे संवेदनशील लेखक : रेणू दांडेकर 

पुणे / प्रतिनिधी :

सहवेदनेने घायाळ होणारे लेखक म्हणजे पूलं. पुलंचे व्यक्तिमत्व हे अतिशय संवेदनशील होते. सहवेदनेने ते घायाळ व्हायचे, पण तरीही त्यांनी नेहमीच लोकांना हसवून जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिला. आजच्या ताणतणावाच्या काळात पुलंचे लेखन हे या ताणतणावावरील सगळय़ात महत्त्वाचे औषध आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू दांडेकर यांनी व्यक्त केले.

पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘पु. ल. परिवारा’च्या सहयोगाने, ‘आशय सांस्कृतिक’ व ‘स्क्वेअर 1’ ने वर्षभर आयोजित केलेल्या ‘ग्लोबल पुलोत्सवा’च्या समारोप सोहळय़ानिमित्त  रेणू दांडेकर यांना ज्येष्ठ  लेखिका डॉ. मीना प्रभू यांच्या हस्ते ‘पुलं कृतज्ञता सन्मान’ प्रदान करण्यात आला. शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 25000 रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सन्मान प्रदानानंतर रेणू दांडेकर यांच्याशी राजेश दामले विशेष संवाद साधला.

यावेळी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर, ज्येष्ठ  सामाजिक कार्यकर्ते राजा दांडेकर, आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, सुप्रिया चित्राव, स्क्वेअर 1चे नयनीश देशपांडे आणि मयूर वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना  रेणू दांडेकर म्हणाल्या, ताणविरहित जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करणारी अनेक सत्रे अलीकडे होत असतात. त्या ऐवजी पुलंच्या लेखनाचे वाचन केले तरी आपल्याला सकारात्मक जगण्याचा, शांतीने जगण्याचा मार्ग निश्चितच सापडू शकतो. त्याच्या आधारे आपण चिरतरुण राहून नव्या उमेदीने जीवन जगू शकतो एवढी ताकद पुलंच्या साहित्यात आहे. महाराष्ट्राच्या खेडोपाडी प्रचंड ज्ञान दडलेले आहे. खेडय़ात राहून सामाजिक काम करण्याचा निर्णय मी महाविद्यालयात असतानाच घेतला होता. माझ्या या निर्णयाला माझ्या घरातील कुटुंबियांनी खूप पाठिंबा दिला. माझ्या आई-वडिलांच्या रूपाने माझ्या समोर प्रचंड कष्टमय आयुष्य जगणारे आणि तरही प्रचंड ध्येयवादाने झपाटलेले आदर्श जोडपे उभे होते.

माझ्या आईवडिलांनी आम्हाला प्रचंड भौतिक सुख दिले आणि त्याचबरोबरीने स्वातंत्र्यही दिले. त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे भौतिक सुखातील फोलपणा वेळीच आमच्या लक्षात आला. तसेच खऱया कार्यातील आनंद काय असतो, त्यातून मिळणारे समाधान काय असते हेही त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कृतीतून नेहमीच दाखवून दिले. मराठवाड्यामध्ये मी प्राध्यापकी करीत असताना एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राजा दांडेकर यांच्याशी परिचय झाला. आमचे विचार जुळले आणि सामाजिक कार्याच्या विचारांची नाळ जुळली आणि आम्ही विवाहबद्ध झालो. विवाहानंतर कोकणात गेल्यानंतर लोकमान्य टिळकांच्या चिखल गावात तात्या टिळक यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्याच ठिकाणी आम्ही आमचे कार्य सुरू केले.

ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी यांचे संस्कार आजही खेडोपाडी दिसून येतात. मला माहेरी आणि सासरी अशा दोन्ही कुटुंबांमध्ये व्यासंगी आणि संस्कारी व्यक्तींचा सहवास लाभला, हे माझे भाग्यच आहे. या सगळय़ाचा हातभार माझ्या जडणघडणीत लागला आणि आम्ही  मोठय़ा उमेदीने काम करू शकलो. अनेक अडचणींवर मात करून चिखल गावात 1984 साली गोठय़त आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि त्यानंतर पुढे श्रमदानातून  मोठय़ा शाळेची उभारणी करण्यात आली. या सगळय़ा प्रवासात कुटुंबियांबरोबर अनेक सुहृदांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

 यावेळी  डॉ. मीना प्रभू यांनी पुलंच्या पर्यटनविषयक आठवणींना उजाळा दिला. यानंतर रात्री ‘पुलकित गाणी’ हा पुलकित गीतांवर आधारित एक विशेष कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमामध्ये माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे, मंगेश पाडगावकर, गजाननराव वाटवे, पं. भीमसेन जोशी, राम गबाले आदी मान्यवरांनी पुलंविषयीच्या आपल्या भावना पडद्यावर व्यक्त केल्या. या कार्यक्रमाची निर्मिती स्वरानंद प्रतिष्ठानची होती, तर संगीत संयोजन केदार परांजपे यांचे होते. शिल्पा पुणतांबेकर, सावनी दातार व ऋषीकेश बडवे या गायक कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला. रमाकांत परांजपे, नीलेश देशपांडे, राजेंद्र दूरकर, पराग माटेगावकर, आदित्य आपटे या वादक कलाकारांनी त्यांना साथसंगत केली. तर कार्यक्रमाचे निवेदन आनंद माडगूळकर यांनी केले.

Related posts: