डास मुक्तीची सांगलीत अंमलबजावणी सुरू

सांगली / ऑनलाईन टीम
सांगली महापालिका क्षेत्रात असलेल्या डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी सांगली महापालिकेने सोमवारपासून झोननिहाय स्प्रेयींग प्लॅनची अंमलबजावणी सुरू केली आहे. बरोबर सात दिवसांनी औषध फवारणीद्वारे शहर डास मुक्त करण्याचे आपले उद्दिष्ट आहे असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी तरुण भारत शी बोलताना सांगितले.
यानुसार प्रत्येक झोनमध्ये औषध फवारणी होणार आहे. बरोबर सात दिवसांनी फवारणी झाल्यास डासांची पैदास थांबते. त्यामुळे हा प्लॅन यशस्वी ठरला तर महापालिकेचे डास मुक्त शहराचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. एकाच वेळेस मनपाचे १८ स्प्रेयींग ट्रॅक्टर्स एकेका भागात जाऊन संपूर्ण भागात फवारणी करतील. दोन ट्रॅक्टर राखीव ठेवण्यात आले आहेत. सोमवारी प्रभाग ११, १२, १३, १४, मंगळवारी १७,१०,१५,१७ बुधवारी १८, १९, ८, ९, गुरुवारी १, २, ३, ४, शुक्रवारी ५, ६, ७, २० आणि शनिवारी संपूर्ण महापालिका क्षेत्रातील २० प्रभागांच्या सार्व जनिक ठिकाणी फवारणी केली जाईल. हाच आराखडा प्रत्येक आठवड्याला पाळल्याने डास उत्पत्ती थांबेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
नागरिकांनी आपल्या भागात याची यशस्वी अंमलबजावणी करून घ्यावी. फवारणी वाहन आपल्या भागात नेमून दिलेल्या दिवशी न आल्यास प्लॅनमध्ये उपलब्ध करून दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. या विभागाचे विभाग प्रमुख म्हणून श्रीपाद जोशी (मोबाईल क्र. ९८२२१८५९४५) हे काम पाहतील. नागरिकांची काही तक्रारी असल्यास विभाग प्रमुख जोशी याकडे सांगाव्यात असे आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.