|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भाजप सरकारविरोधात काँग्रेसची जोरदार निदर्शने

भाजप सरकारविरोधात काँग्रेसची जोरदार निदर्शने 

प्रतिनिधी : रत्नागिरी

केंद्रातील भाजप सरकारने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीप्रकरणी शेतकऱयांना अत्यंत तुटपुंजी मदत करून एकप्रकारे थट्टा केलेली आहे. तर गरीब मच्छिमार क्यार, महा या चक्रीवादळांनी हतबल झालेला असताना त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे अपयशी ठरलेल्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी रत्नागिरीतील काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

अवकाळी पावसामुळे संपूर्ण राज्यासह, रत्नागिरी जिल्ह्यातही भातशेतीचे मोठे नुकसान झाले. त्या नुकसानीपोटी अद्यापही शेतकऱयांना मदत मिळालेली नाही. महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण तीनशे पंचवीस तालुक्यातील शेतकऱयांची पिके उध्वस्त झाली आहेत. याबाबत सरकारने अत्यंत तुटपुंजी मदत बळीराजाला करुन एकप्रकारे थट्टा केली आहे. केंद्रात सरकार आणि गेली पाच वर्षे महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारच्या नियोजित धोरणांमुळे देशातील जनतेला हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. देशात हेकेखोरपणे अवलंब केलेल्या आर्थिक धोरणांमुळे मंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. बंद होणारे कारखाने त्यामुळे तरूणांच्या नोकऱया जात आहेत. तरुणांना कामधंदा मिळत नसल्याने बेरोजगारी वाढली आहे.

त्याचबरोबर राज्याच्या किनारपट्टीवर मच्छीमारी करुन राहणारा गरीब मच्छीमार क्यार, महा वादळामुळे हवालदिल व हतबल झालेला आहे. त्याला या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने भरघोस मदत देणे गरजेचे आहे. याबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत. मच्छीमार बांधवांचा सरकारकडून मिळणारा हक्काचा डिझेल परतावा गेली पाच वर्षे मिळाला नाही. त्यामुळे या सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन कार्यक्रम आखलेले आहे. रत्नागिरीतही सोमवारी हे आंदोलन करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्हा काँग्रेसने धरणे आंदोलन करत भाजपा सरकारचा निषेध नोंदविला. मोदी सरकार हायहायच्या घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्त्व जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले, आमदार हुस्नबानू खलिपे, प्रसाद उपळेकर, हारिस शेखासन, माजी उपनगराध्यक्ष बाळा मयेकर, अशोकराव जाधव, खारवी विकास समितीचे अध्यक्ष दामोदर लोकरे ,अविनाश लाड, प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस रुपाली सावंत, दीपक राऊत, विधानसभा क्षेत्र समन्वयक कपिल नागवेकर, महिला तालुकाध्यक्ष अजमेरा शेख, महिला शहर अध्यक्ष रिजवाना शेख, निसार बोरकर, रवी खेडेकर, इम्तियाज शेख आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.

Related posts: