|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » solapur » शिक्षकी पेशाला काळीमा फासणार्‍याला तीन वर्षे कारावास

शिक्षकी पेशाला काळीमा फासणार्‍याला तीन वर्षे कारावास 

प्रतिनिधी / कुर्डुवाडी

शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या माढा तालुक्यातील बारलोणी येथील शिक्षकास अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी न्यायालयाने तीन वर्षे शिक्षा व ८ हजार रूपयांचा दंड ठोटावला आहे. चांगदेव ईश्वर कांबळे असे या शिक्षा ठोठावण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. लहान मुलांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचा कमी कालावधीत १० महिन्यांत देण्यात आलेला हा पहिला निकाल आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १९ फेब्रवारी २०१९ रोजी पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असल्याचा फायदा घेऊन लैंगिक विनयभंग केल्या प्रकरणी कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर न्यायालयाने अवघ्या दहा महिन्यात सदर प्रकरणाचे कामकाज पूर्ण केले.

या प्रकरणी सहा साक्षीदारांची सरकारी पक्षातर्फे तपासण्यात आले. याप्रकरणी पीडित मुलगी, तपास अधिकारी व साक्षीदार यांचे पुरावे ग्राह्य धरून शिक्षक चांगदेव ईश्वर कांबळे यास पीडितेच्या घरात घुसून लैंगिक विनयभंग केल्याप्रकरणी कलम ४५२ अन्वये एक वर्ष साधी कैद, कलम ५०६ अन्वये १ वर्ष साधी कैद व बाललैंगिक अत्याचार अधिनियम कायद्याचे कलम १२ अन्वये १ वर्ष कैद असे मिळून ३ वर्षे साधी कैद व ८ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले आहेत.

सरकारी वकील अॅड.दिनेश देशमुख आणि अॅड.प्रदीप बोचरे यांनी तर मुळ फिर्यादी वकील म्हणून अॅड.हरिश्चंद्र कांबळे यांनी काम पाहिले.तर कोर्ट पैरवी म्हणून भाऊराव शेळके व तपासीक अंमलदार दराडे यांनी काम पाहिले.

Related posts: