|Saturday, December 7, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » येणे संशोधनाने तोषावे सकळजन!

येणे संशोधनाने तोषावे सकळजन! 

अर्थशास्त्र विषयातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी डॉ. अभिजित बॅनर्जी, डॉ. ईस्थर डुफलो आणि डॉ. मायकेल पेमर या त्रिमूर्तींना नोबेल पारितोषिक मिळाल्याची बातमी आनंददायी होती.

विकास अर्थशास्त्र’ विषयात परिणामकारक हस्तक्षेपी संशोधनाबाबत हा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला आहे. डॉ. अभिजित, मराठी मातेचे सुपुत्र आहेत. अर्थशास्त्र विषयातील नोबेल मिळवणारे ते दुसरे भारतीय ठरले आहेत. डॉ. ईलिनोर ओस्ट्रोम यांच्यानंतर अर्थशास्त्र विषयामधील नोबेल मिळवणारी दुसरी आणि सर्वाधिक तरुण महिला म्हणून डॉ. ईस्थर यांचा यथार्थ गौरव झाला आहे. पती-पत्नी उभयता म्हणून नोबेल मिळवणारी ही जोडी सहावी आहे. हस्तक्षेपी संशोधनामध्ये मायकेल पेमर यांच्या आफ्रिका खंडातील कामाच्या गोष्टी ‘दंतकथा’ वाटाव्यात इतक्मया सुरस आहेत. या तिघांच्या संशोधनाचा पाया ‘हॉवर्ड’ विद्यापीठात रचला गेला होता. 

हस्तक्षेपी संशोधनाला वैद्यकीय परिभाषेत ‘रॅन्डमाईज कंट्रोल ट्रायल्स’ (आर.सी.टी.) म्हणतात. संख्याशास्त्रज्ञ रोनाल्ड फिशर यांनी 1930 मध्ये ही पद्धत शोधली होती. हस्तक्षेपी संशोधनामध्ये समान गुणधर्म असणाऱया दोन गटांपैकी एका गटावर प्रयोग करून व दुसऱया गटावर कोणतेही प्रयोग न करता निरीक्षण केले जाते. पहिल्या गटाला प्रायोगिक (एक्सपरिमेंटल) तर दुसऱयाला नियंत्रित (कंट्रोल) गट म्हणतात. प्रायोगिक गटात कोणते ‘हस्तक्षेप’ (इंटरव्हेन्शन) प्रभावी ठरत आहेत, याचे अनुमान काढून नवीन औषधे, नवीन परिमाणे, नवीन सिद्धांत उदयास येत असतात. वैद्यक शास्त्र, मनोचिकित्सा, मानसशास्त्र, शिक्षण आणि वर्तणूक शास्त्रात ही संशोधन पद्धत नियमितपणे वापरली जाते. पाश्चात्य देशात, विशेषत: उद्यमशील विद्यापीठात, प्रगत संशोधन संस्थांमध्ये ही पद्धत उपयोजून ज्ञाननिर्मिती केली जाते. आपल्या देशातील सामाजिक शास्त्रातल्या अनेक अभ्यास विषयांमध्ये ही संशोधन पद्धत वापरण्याबाबत गैरसमजापेक्षाही बौद्धिक मांद्य, आळशीपणा, वरपांगीपणा ही कारणे जास्त दिसून येतात. ‘समज’ वाढवून गैरसमज दूर करता येतात. त्यासाठी अभ्यास, सातत्य, प्रयोगशीलता, संवादी वृत्ती, कठोर आत्मपरीक्षण, प्रामाणिकपणा यासारखे गुण आवश्यक ठरतात. वर्तमानात अनेक क्षेत्रात लोकांना प्रश्नांचाच कंटाळा असल्यामुळे, ‘उत्तरे’ शोधण्याचे संशोधन वा चर्चा दुर्मिळ झाल्या आहेत.डॉ. अभिजित, डॉ. ईस्थर आणि डॉ. मायकेल यांचे मोठेपण त्यांच्या छोटय़ा-छोटय़ा सातत्यपूर्ण संशोधनात आहे. सैद्धांतिक चर्चांच्या जंजाळात अडकून पडण्यापेक्षा, विकसनशील आणि गरीब देशांमध्ये दारिद्रय़ निर्मूलनासाठीचे कोणते हस्तक्षेप जास्त परिणामकारक ठरतात, कोणते ठरत नाहीत याचा अविरत शोध त्यांच्या कामाच्या हृदयस्थानी आहे. दारिद्रय़ाला अनेक सामाजिक प्रश्नांचे उगमस्थान मानल्यास गेल्या शेकडो वर्षात आपण दारिद्रय़ाच्या प्रश्नाची सोडवणूक करू शकलो नाही याचे कारण आपल्या शिक्षणक्षेत्राच्या दुरवस्थेमध्येदेखील आहे. शिक्षण हे स्मरणाच्या कसोटीपेक्षाही आकलन आणि उपयोजनाच्या कसोटीवर टिकायला हवे, हा प्रागतिक विचार अजूनही आपल्याकडे रुजत नाही. देशाला लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ आणि संशोधनाची निर्मिती शिक्षण व्यवस्थेत होत असल्यामुळे, आपल्या अनेक प्रश्नांची उकल शिक्षण व्यवस्थेमार्फत होऊ शकते. ज्यांच्याकडून उत्तरांची अपेक्षा करावी, त्यांचेच स्वरुप ‘प्रश्नार्थक’ दिसत आहे. डॉ. अभिजित-डॉ. ईस्थर या उभयतांनी आपला भारतीय मित्र डॉ. सेंधील मुलाईनाथन यांच्या मदतीने ‘जे-पाल’ नावाचे जागतिक संशोधन केंद्र स्थापन केले आहे. या संशोधन केंद्रामार्फत नानाविध देशातील सरकारांसाठी, वित्तीय संस्थांसाठी, मोठय़ा स्वयंसेवी संस्थांसाठी संशोधन केले जाते. शासनाच्या कार्यक्रमांची परिणामकारकता तपासली जाते. या केंद्रामार्फत भारतातही विपुल कामे झाली आहेत.  शिक्षणक्षेत्रातील आणि विशेषत: सामाजिक शास्त्रे, मानविकी, मूलभूत विज्ञान आदी ज्ञानशाखातील वरपांगी संशोधनामुळे नवीन ज्ञाननिर्मिती, तंत्रज्ञान, बौद्धिक संपदा तयार होत नसल्यामुळे आर्थिक आघाडीवर आणि शैक्षणिक क्रमवारीत आपण पिछाडीवर जात आहोत. जागतिक क्रमवारीतील शिखर विद्यापीठे अधिकतर अमेरिकेत आढळतात. गुणवत्तेचे चीज आणि संधी, उत्कृष्ट कार्यसंस्कृती आणि कामाचे स्वातंत्र्य, विद्यापीठे आणि उद्योजकांचे अन्योन्य संबंध, संशोधन आणि अर्थकारण याचा संबंध ही त्यामागील काही कारणे आहेत. भारतात बुद्धिमत्ता आहे, मात्र कष्ट करण्याची वृत्ती आणि कार्यसंस्कृती अमेरिकेमध्ये आहे याचा निर्वाळा दस्तुरखुद्द डॉ. अभिजित बॅनर्जी यांचाच आहे.

शिक्षणातील आणि संशोधनातील गुणवत्तेबाबत आपण अजूनही चाचपडत आहोत. हितसंबंधांची शृंखला कोणी मोडायची? अजगरासारख्या सुस्तावलेल्या, जबाबदारी विसरलेल्या यंत्रणेत प्राण कसे फुंकायचे, असे काही प्रश्न अनिर्णात आहेत. सामान्य माणसांना कस्पटासारखी लेखणारी आणि अति विशिष्टांच्या इशाऱयावर चालणारी व्यक्ती केंद्री व्यवस्था निर्माण झाली आहे. या व्यवस्थेची संगती कशी लावायची? स्थानिक पर्यावरण, प्रशासन, लोककेंद्री कसे करायचे? आपल्या शाळा, महाविद्यालये, इस्पितळे, महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांची गुणवत्ता कशी वाढवायची? दारिद्रय़ निर्मूलनाच्या कार्यक्रमातून आपण संसाधन निर्मिती कशी करायची यासारखे अनेक प्रश्न ‘कृती संशोधना’साठी आव्हान म्हणून उभे आहेत. या त्रिमूर्तिंच्या संशोधनातून जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, बिल गेट्स आणि मिलिंडा फाउंडेशनसारख्या मोठय़ा संस्था प्रभावित झाल्या आहेत. संबंधित शासन आणि संस्था संशोधनाची मदत घेऊन त्यांच्या योजना नव्याने आखतात. शासकीय कार्यक्रम, धोरणात्मक पातळीवरचा संवाद, प्रशासकीय अथवा अंमलबजावणी करणाऱया यंत्रणेमध्ये चांगल्या संशोधनातून सुधारणा घडवून आणता येऊ शकतात असा आत्मविश्वास अनेक संशोधनांनी याआधीही दिलेला आहे. भारतीय विद्यापीठांमधील संशोधन हे व्यक्तिगत आकांक्षापूर्ततेइतकेच स्थानिक समस्या, स्थानिक विकास आणि नवीन ज्ञान-निर्मितीच्या कामी लागायला हवे. नोबेल पुरस्कारानिमित्त या त्रिमूर्तिंचे कौतुक तर व्हायलाच हवे. त्यांच्या संशोधनाचे आकलन करून आपल्या संस्थांची आणि संशोधनाची गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी आपल्यालाच काम करावे लागेल. त्याला पर्याय नाही आणि त्यावाचून तरणोपाय नाही.

डॉ. जगदीश जाधव

Related posts: