|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » सत्तेच्या तीन तऱहा सत्ता स्पर्धेत शिवसेना अपयशी

सत्तेच्या तीन तऱहा सत्ता स्पर्धेत शिवसेना अपयशी 

शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसचा नकार?

राज्यपालांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणा

पाठिंब्यासाठी वेळ वाढवून देण्याची शिवसेनेची मागणी राज्यपालांनी फेटाळली

सत्तासंघर्षाला नाटय़मय वळण

मुंबई / प्रतिनिधी

राज्यात सरकार स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केलेल्या शिवसेनेला सोमवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर करता आले नाही. काँग्रेसच्या श्रेष्ठींनी शिवसेनेला सखोल चर्चेशिवाय पाठिंबा देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येते. शिवसेनेला 145 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर न करता आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेतील तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले आहे. राष्ट्रवादीला उद्या (मंगळवार) रात्री 8.30 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा गुंता आणखी वाढला आहे. शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा करताना दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्याची पत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची वेळ मागितली. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला आहे.

राज्यपालांच्या पत्रानंतर राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील आदींनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज, मंगळवारी रात्रीपर्यंत 8.30 वाजताची वेळ दिल्याची माहिती दिली. आघाडीत आमचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसशी चर्चा करून आम्ही आमचा निर्णय घेऊ आणि त्याची राज्यपालांना देणार असल्याचे पाटील म्हणाले.

 राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक, काँग्रेस नेते मुंबईत

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या (मंगळवार) बैठक होत आहे. या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीची बैठक होत असताना काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि के. सी. वेणुगोपाल हे उद्याच मुंबईत दाखल होणार आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा निरोप घेऊन हे नेते पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर आघाडीची भूमिका स्पष्ट होऊ शकेल.

वेगवान राजकीय घडामोडींचा दिवस

विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने सरकार स्थापन करण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर राज्यपालांनी दुसऱया क्रमांकाचा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यासाठी सोमवारी संध्याकाळी 7.30 वाजताची वेळ दिली होती. परंतु, या वेळेत दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र दिले नाही. बहुमतासाठी आवश्यक असलेले पाठिंब्याचे पत्र सादर करण्यास अपयश आल्याने राज्यपालांनी शिवसेनेला मुदत वाढवून देण्यास नकार दिला. त्यामुळे गेल्या दोन आठवडय़ांहून अधिक काळ रंगलेल्या सत्तानाटय़ात आणखी रंग भरला आहे.

शिवसेनेकडून सत्तेचा दावा कायम

शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई आदी शिवसेना नेत्यांनी सोमवारी संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी त्यांनी शिवसेना आणि शिवसेनेला पाठिंबा देणाऱया अपक्ष आमदारांचे पत्र सादर केले. मात्र, शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीचे समर्थनाचे पत्र सादर करता आले नाही. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना आमचा सत्ता स्थापनेचा दावा कायम असल्याचे सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यासाठी आम्ही दोन दिवसांची मुदत  मागितली. परंतु, राज्यपालांनी आम्हाला वेळ वाढवून दिला नसला तरी आमचा दावा कायम ठेवल्याचे आदित्य म्हणाले.

काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र

दरम्यान, सोमवारी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करण्याचा निर्णय झाला. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसचे पत्र तसेच आमदारांच्या सहय़ांचे पत्र तयार होते. मात्र, सोनिया गांधींनी विचारधारेशी तडजोड करून शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अनुकूलता दर्शवली नाही, असे सांगण्यात आले. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची तसेच पुढील चर्चा मुंबईत होणार असल्याचे सांगितले.

शिवसेना नेते दिल्लीत

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल असली तरी काँग्रेसचा पाठिंबा मिळविणे शिवसेनेसाठी सर्वात आव्हानात्मक बाब आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी सोमवारी नवी दिल्लीला आपल्या विश्वासू सहकाऱयांना पाठवले. शिवसेना सचिव अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी सकाळी नवी दिल्लीत काँग्रेस नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. या भेटीनंतर काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला. काँग्रेस आमदारांचा कल बिगरभाजप सरकारकडे असल्याने काँग्रेसने सकाळी कार्यसमितीची बैठक घेतली आणि त्यानंतर जयपूरहून काँग्रेस नेत्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. प्रदीर्घ काळ चर्चा केल्यानंतरही काँग्रेसला आपला निर्णय घेता आला नाही.

शरद पवार-उध्दव ठाकरे भेट

नवी दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या बैठका होत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या सहकाऱयांसोबत चर्चा केली. चर्चेनंतर काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहण्याचे ठरवले. यशवंतराव चव्हाण केंद्रातील बैठकीनंतर वांद्रे येथील ‘ताज लॅण्डस् एण्डस्’ हॉटेलमध्ये पवार आणि उध्दव ठाकरे यांची भेट झाली. या भेटीत काँग्रेसचा पाठिंबा मिळविण्याबाबत खलबते झाल्याचे समजते.

शिवसेना एनडीएतून बाहेर?

महाराष्ट्रातील सत्तापेच लक्षात घेऊन शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सावंत यांना राजीनामा देण्याचा आदेश देऊन शिवसेनेने भाजपप्रणित एनडीएमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.

राष्ट्रपती राजवटीची शक्यता

भाजपच्या पाठोपाठ शिवसेना सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरल्याने आजचा दिवस राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचा आहे. राज्यपालांनी राष्ट्रवादीला सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. त्यासाठी रात्री साडेआठपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीत सत्ता स्थापनेची कोंडी फुटली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे.

सत्ता स्थापनेचा गुंता कायम….

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपमध्ये दिवसभर मॅरेथॉन बैठका

नवी दिल्लीत शिवसेना नेत्यांनी घेतली काँग्रेस नेते अहमद पटेलांची भेट

काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील पेचप्रसंगावर चर्चा

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची काँग्रेस नेत्यांशी फोनवरून संवाद

‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला तत्त्वत: पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पाठिंब्याच्या पत्राची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही दोन दिवसांची मुदत मागितली आहे. राज्यपालांनी आम्हाला मुदत वाढवून दिली नसली तरी आमचा सत्ता स्थापनेचा दावा कायम आहे’

आदित्य ठाकरे

शिवसेना नेते

‘भाजप कोअर समितीची आज बैठक झाली. बैठकीत राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला. राजकीय घडामोडींवर आमचे बारीक लक्ष आहे. आमची भूमिका वेट ऍण्ड वॉचची आहे’

सुधीर मुनगंटीवार

भाजप नेते

दिवसभरात

– शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री पदाचा राजीनामा देत शिवसेना एनडीएतून बाहेर

–  भाजपने शिवसेनेवर खापर फोडू नये : शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषदेत वक्तव्य

– शरद पवारांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक

– शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत पहिली काँग्रेसने भूमिका जाहीर करावी, मग राष्ट्रवादीचा निर्णय : नवाब मलिक

– शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यात दुपारी बैठक

– काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाल्याचे सांगत सेना नेते राजभवनावर

– वेळेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र न मिळाल्याने आणि वेळ संपल्याने शिवसेना परत

– शिवसेनेने वेळ वाढवून मागितली मात्र राज्यपालांचा नकार. शिवसेनेचा दावा कायम असल्याचे आदित्य ठाकरेंकडून स्पष्टीकरण

– शिवसेना नेते संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने लीलावतीत रुग्णालयात राऊत दाखल

– शिवसेनेनंतर राष्ट्रवादीला राज्यपालांकडून आमंत्रण

– राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे राजभवनावर

– राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदारांसोबत बोलवून तसेच मित्रपक्षांशी बोलून निर्णय घेणार असल्याची जयंत पाटील यांची माहिती

– संजय राऊत यांच्यावर अँजिओग्राफीनंतर यशस्वीरीत्या अँजिओप्लास्टी

– राज्यातील घडामोडींवर भाजपचा वेट अँड वॉचचा निर्णय : मुनगंटीवार यांची पत्रकार परिषदेत माहिती

Related posts: