|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » अयोध्या : कार्यशाळेतील गजबज वाढली

अयोध्या : कार्यशाळेतील गजबज वाढली 

दगडांवरील कोरीवकामाला वेग : देशभरातील धार्मिक संघटनांकडून देणगी जाहीर

वृत्तसंस्था/ अयोध्या 

 अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर रामनगरीत मंदिर उभारणीच्या तयारीला वेग प्राप्त झाला आहे. दोन मजली प्रस्तावित राम मंदिराची रुपरेषा यापूर्वीच तयार झाली असून पहिल्या मजल्यासाठीचे काम जवळपास पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. अयोध्येत कारसेवकपुरम नजीकच्या कार्यशाळेत प्रस्तावित मंदिरासाठी दगड कोरण्याचे काम काही काळापासून बंद होते. तेथील कामकाज सांभाळणारे गुजरातचे स्थापत्यतज्ञ अन्नूभाई सोमपुरा यांना निर्णयापर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले होते. पण आता मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याने कार्यशाळेत पुन्हा लगबग सुरू झाली आहे.

212 स्तंभांवर उभारले जाणाऱया राम मंदिरासाठी अद्याप अनेक दगड कोरणे जाणे शिल्लक आहे. आणखीन 20 लाख घनफूट दगडांची गरज भासणार आहे. विश्व हिंदू परिषदेच्या प्रारुपानुसार मंदिर उभारणीकरता 4-5 वर्षांचा कालावधी लागणार आहे. जुन्या दगडांना साफ करण्यासह नव्या दगडांवर कोरीवकाम करावे लागेल. राजस्थानच्या भरतपूर येथील खाणीतून दगड येणार असल्याचे विहिंपचे संघटनमंत्री त्रिलोकीनाथ पांडे यांनी सांगितले आहे.

मंदिर 5 हिस्स्यांमध्ये विभागून उभारले जाणार आहे. पहिला हिस्सा मंदिराचा समोरच्या भागाचा असेल, त्यानंतर दरवाजे असून प्रस्तावित प्रारुपात त्यांना सिंहद्वार संबोधिण्यात आले आहे. पुढील भागात दोन मंडप असून बाहेरून आत दाखल होताना पहिला नृत्य मंडप तर दुसरा रंगमंडप असेल. पुढील टप्प्यात गर्भगृह राहणार असून खाली रामलल्ला विराजमान झाल्यावर वरच्या मजल्यावर रामदरबार असणार आहे

मंदिराच्या प्रत्येक मजल्यावर 106 स्तंभ

दोन्ही मजल्यांवर स्तंभांची संख्या आणि आकार समान ठेवण्यात आला आहे. दोन्ही मजल्यांवर प्रत्येकी 106 स्तंभ असणार आहेत. प्रत्येक स्तंभाची उंची 14 फूट 6 इंच ठेवण्यात आली आहे. स्तंभामध्ये चारही दिशेला विविध मूर्ती असणार आहेत. एका स्तंभात 16 मूर्तींचे दर्शन घडणार आहे.

संघाचा 100 वा स्थापनादिन

राष्ट्रीय स्वंयसेवकाला 2025 मध्ये 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. 100 व्या स्थापनादिनी रामलल्ला स्वतःच्या भव्य मंदिरात विराजमान असावेत. सरकारची भूमिका आणि वृत्तीही स्पष्ट असल्याने कुठलाच अडथळा येण्याची शक्यता नसल्याचे विहिंप पदाधिकाऱयाने म्हटले.

10 कोटी देणार महावीर ट्रस्ट

पाटणा येथील महावीर मंदिर ट्रस्टने राम मंदिरासाठी 10 कोटी रुपयांच्या देणगीची घोषणा केली आहे. दरवर्षी दोन कोटी रुपये 5 वर्षांपर्यंत दिले जातील. तर राममंदिराला लागून असलेल्या अमावा मंदिरात भाविकांच्या भोजनाची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. सद्यकाळात प्रशासकीय बंधनामुळेच दिवसाच भोजन उपलब्ध केले जत आहे. आगामी काळात रात्रीही भोजन उपलब्ध करण्यात येईल.

Related posts: