|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » फूडबर्डच्या अध्यक्षासह दहा जणांवर गुन्हा

फूडबर्डच्या अध्यक्षासह दहा जणांवर गुन्हा 

जिह्यात दीड कोटींचा गंडा : 140 शेतकऱयांचा समावेश

प्रतिनिधी/ सांगली

कडकनाथ कुक्कटपालन प्रकल्पातून भरघोस नफ्याचे आमिष दाखवत फलटण (जि. सातारा) येथील फूडबर्ड ऍग्रो प्रा. लि. कंपनीने जिह्यातील 140 शेतकऱयांना  दीड कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कंपनीच्या अध्यक्षासह 10 जणांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इसाक अजमुद्दीन पठाण (वय 41 रा. अहिल्यानगर, कुपवाड) या शेतकऱयाने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कंपनीचे अध्यक्ष मोहन भालचंद्र निंबाळकर, संचालक योगेश मोहन निंबाळकर, गणेश अरविंद निंबाळकर, सुनील अण्णा धायगुडे, राहूल दत्तात्रय ठोंबरे, सचिन तुकाराम करे, सुखदेव रामचंद्र शेंडगे, संजय भगवान भोरे, जॉनसन ख्रिस्तोफर रायचुर, मुख्यव्यवस्थापक शौकत मिरासो करीम (पद्माळे, ता. मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दोन महिन्यापूर्वी इस्लामपूर येथील महारयत ऍग्रोचा मोठा घोटाळा उघडकीस आला होता. कंपनीने जवळपास 500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले होते. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तोपर्यंत सातारा जिह्यातील फलटण येथील फूडबर्ड ऍग्रो प्रा. लि. या कंपनीनेही ‘कडकनाथ’ व्यवसायामध्ये भरमसाठ नफ्याचे आमिष दाखवज जिह्यातील 140 शेतकऱयांना दीड कोटी रुपयांना गंडा घातला आहे.

गेल्या महिनाभरापासून सांगलीत शंभर फुटी रस्त्यावरील पाकिजा मशिद समोर असलेले कंपनीच्या कार्यालयाला कुलूप लावण्यात आले आहे. दरम्यान इसाक पठाण यांनी कंपनीकडे कडकनाथ कुक्कटपालन प्रकल्पासाठी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली. कंपनीने पैसे भरल्याच्या पावत्याही त्यांना दिल्या. याबाबत  करारही करण्यात आले आहेत. पठाण यांना सुरूवातीला कंपनीने दोन महिने चांगली सर्व्हिस †िदली. मात्र त्यांनतर कंपनीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. याबाबत कंपनीच्या अधिकाऱयांच्याकडे त्यांनी विचारणा केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पठाण यांनी सोमवारी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंपनीचे अध्यक्ष मोहन निंबाळकर यांच्यासह दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिह्यात दीड कोटींचा गंडा

फूडबर्डने जिह्यातील 140 गुंतवणूकदार शेतकऱयांना दीड कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतकऱयांच्यामध्ये खळबळ उडाली आहे. महारयतच्या पाठोपाठ फूडबर्डनेही शेतकऱयांना दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, सांगलीसह सातारा व कोल्हापूरमधील शेतकऱयांना जवळपास साडे सात कोटींचा या कंपनीने गंडा घातल्याची चर्चा आहे.

Related posts: