|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » Top News » राष्ट्रपती राजवट केव्हा व कशी लागू होते ?

राष्ट्रपती राजवट केव्हा व कशी लागू होते ? 

ऑनलाईन टीम : मुंबई

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन आठवडे झाले तरी नवे सरकार अस्तित्वात येऊ शकले नाही. मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत वाढलेली दरी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत नसलेलं एकमत यामुळे सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वप्रथम सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले. मात्र शिवसेना सोबत नसल्याने बहुमताचा आकडा गाठू शकत नाही म्हणून त्यांनी असमर्थता दर्शवली. त्यानंतर शिवसेनाही वेळेत बहुमताची जुळवाजुळव करू शकली नाही. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादीतील चर्चेच्या फेर्‍या सुरूच आहेत मात्र थेट तोडगा निघाला नाही. त्यामुळे राज्यात तिसर्‍यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

राष्ट्रपती राजवट केव्हा लागू होते ?

भारताच्या राज्यघटनेत कलम 352 ते 360 ही आणीबाणीशी संबंधित आहेत. कलम 356 अन्वये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तरतूद आहे. राज्याचा कारभार राज्यघटनेनुसार चालत नसला किंवा तसा चालवणं अशक्य असल्यास राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करतात. त्यानुसार राष्ट्रपती राजवट लागू होते. या काळात राज्यपालच राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून राज्याचा कारभार पाहतात.

नवी विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर बहुमत असणार्‍या पक्षाचं लोकनियुक्त सरकार अधिकारावर आणणे ही राज्यपालांची संवैधानिक जबाबदारी असते. नवीन सरकार कोणत्याही कारणाने स्थापन होऊ न शकणे हे राज्याचा कारभार राज्यघटनेनुसार चालवता न येण्याचे द्योतक आहे. त्यावरून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते. सध्या राष्ट्रपती राजवट सहा महिन्यांसाठी लागू करण्यात आली आहे. पण या दरम्यान कुठल्या पक्षाने बहुमताचा आकडा असल्याचं सांगितले आणि सिद्ध केले तर ही राजवट मागे घेऊन सरकार बनवायची संधी दिली जाऊ शकते.

Related posts: