|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » 55 हजार पणत्यांनी उजळला पंचगंगा घाट..!

55 हजार पणत्यांनी उजळला पंचगंगा घाट..! 

प्रतिनिधी / कोल्हापूर

मंद वारे…अन् झुळझुळ वाहणारं पाणी..त्रिपुरारी पौर्णिमेचा लख्ख प्रकाश… ‘कॅरोओके’ अन् ‘अंतरंग’ ग्रुपचे कर्णमधुर गीत-संगीत… शिवमुद्रा प्रतिष्ठान अन् संदीप देसाई सोशल फौंडेशनच्या कार्यकर्त्यांचा उत्साह… घाट परिसरात हळूहळू उजळून निघालेल्या 55 हजार पणत्या…आकर्षक विद्युत रोषणाई.. त्याला साथ मिळाली ती रांगोळीची.. अशा नयनरम्य आविष्कारात मंगळवारी पहाटे त्रिपुरारी पौर्णिमेला पंचगंगा घाट दीपोत्सवात उजळून निघाला..अन् हजारो कोल्हापूरकरांनी सेल्फीसह हा क्षण वर्षभरासाठी जपून ठेवला.

जुना बुधवार पेठेतील शिवमुद्रा प्रतिष्ठान आणि संदीप देसाई सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी रात्री पंचगंगा घाटावर त्रिपुरारीच्या दीपोत्सवाला सुरूवात झाली, हळूहळू घाट परिसरात रांगोळय़ा साकारू लागल्या. कर्णमधुर संगीतात मध्यरात्र उलटली. पहाटे चार वाजता भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, नेपोलियन सोनुले यांच्या उपस्थितीत दीपोत्सवाला प्रारंभ झाला. आमदार चंद्रकांत जाधव, पृथ्वीराज महाडीक यांनी दीपोत्सवाला भेट दिली. दीपोत्सव पाहण्यासाठी गर्दी वाढू लागली. परिसरातील रस्त्यांवर फक्त पार्किंग केलेली वाहनेच पहायला मिळाली. दीपोत्सवाचा आनंद कोल्हापूरकरांनी पहाटेपर्यत लुटला.

कोल्हापुरी खासियत, महिला सक्षमीकरण, स्वच्छ कोल्हापूर रांगोळीत

बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ परिसरातील विविध मंडळांनी पंचगंगा घाटावर विविध विषयांवरील आकर्षक रांगोळय़ा साकारल्या. शुक्रवार पेठेतील आक्रमक तरूण मंडळाने उत्कृष्ट संस्कार भारतीची रंगावली रेखाटली. ‘कोल्हापूर खासियत’ या रांगोळीतून कोल्हापुरी मिसळ, तांबडा, पांढरा रस्सा, कोल्हापुरी चप्पल, गुळ, कोल्हापुरी फेटा, साज, कोल्हापुरी लुगडे असा विषय मांडला गेला. रोटरॅक्ट क्लबने ‘वूमन एम्पॉवरमेंट’द्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. कोल्हापूर महापालिकेने ‘स्वच्छ कोल्हापूर’चा संदेश रांगोळीतून दिला. ही रांगोळी आदित्य बनगे यांनी साकारली. ऋषिकेश पाटील याने महापुरानंतर कोल्हापूरकरांनी दाखवलेल्या संयमाची मांडणी रांगोळीतून केली.

राममंदिर, शिवपुजा, अंबाबाईमूर्तीवर रंगावली

विवेक मित्र मंडळ, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने राममंदिराची प्रतिकृती साकारली. जगदंबा ढोल ताशा पथक, कर्तव्य मित्र मंडळ, चैतन्य तरूण मंडळाने राममंदिरावर आधारीत रांगोळय़ा रेखाटल्या. मस्कुती हायकर्स ग्रुप आणि मस्कुती तलाव तरूण मंडळाने छत्रपती संभाजीराजेंकडून शिवपुजा, अंबाबाईचा विषय आकर्षकरित्या मांडला. टेक्सास तरूण मंडळाने साकारलेली अंबाबाईची प्रतिकृती रांगोळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. लक्ष्मीपुरीतील सत्यनारायण तालीम मंडळाने गणेशमूर्तीची प्लास्टीकच्या माळांद्वारे उत्कृष्ट मांडणी केली. हाय कमांडो प्रेंडस् सर्कलने बालकृष्ण तर कॉमर्स कॉलेजच्या आर्टस् ग्रुपने अर्धनारी नटेश्वर रांगोळी साकारली. ती पुनम मोरे यांनी रेखाटली. महालक्ष्मी प्रतिष्ठानने शिवतांडव हा विषय रांगोळीद्वारे मांडला. ही रांगोळी महेश पोतदार यांनी साकारली. रणांगण ढोंल ताशा पथकानेही रांगोळी साकारली.

फुटबॉल, बेकारीच्या प्रश्नांवर रांगोळीतून प्रकाश

सिद्धार्थनगर येथील श्रीप्रेमी तरूण मंडळाने ‘बेरोजगारी एक अभियान’ या रांगोळीतून बेकारीचा प्रश्न मांडला. मस्कुती हायकर्स च्या बाप्पा लव्हर्स ग्रुपने आकर्षक रांगोळी साकारली. सुधीर बेडेकर यांना श्रद्धांजली वाहणारी रांगोळी शुक्रवार पेठेतील अजिंक्य तरूण मंडळाने साकारली. श्रीमंत प्रतिष्ठानने शाहू स्टेडीयमवरील फुटबॉल मैदानाची रांगोळी काढून ‘सेव्ह कोल्हापूर फुटबॉल’ अशी साद घातली. उत्तरेश्वर-धोत्री मर्दानी आखाडा ग्रुपने फुटबॉलचा विषय मांडला.

अंतरंग ग्रुपच्या भावभक्तिगीतांना प्रतिसाद

आकार प्रस्तुत ‘अंतरंग’ ग्रुपने पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी साडेसात वाजेपर्यत भावभक्तिगीतांचा मैफल रंगवली. महेश हिरेमठ, सोनाली रायकर यांनी गिते सादर केली. प्रा. स्वप्नील पन्हाळकर यांच्या प्रवाही निवेदनाला कीबोर्डवर अकाश साळोखे, ऑक्टोपॅडवरील मनोज जोशी, तबल्यावर गुरू ढोले तर ध्वनियंत्रणेवर श्रीधर जाधव यांची त्यांना साथ लाभली.

विशाल ढवण मित्र परिवाराने दुधवाटप केले. घाटावरील सिद्धेश्वर मंदिरासह अन्य मंदिरे विद्युत रोषणाईत न्हावून निघाली. जुना शिवाजी पूलही रोषणाईत उजळून निघाला. पंचगंगा घाटासह नदीचे पात्रही 55 हजार पणत्या आणि आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले. तरूणाईसह आबालवृद्धांनीही दीप लावण्याचा आनंद लुटला. कित्येकांनी दीपोत्सवात सेल्फी घेण्याला प्राधान्य दिले, या दीपोत्सवाला कोल्हापूरकरांनी उस्त्फुर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

Related posts: