|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बकऱयांची पैदास घटली, मटण महागले

बकऱयांची पैदास घटली, मटण महागले 

प्रतिनिधी / कोल्हापूर

नैसर्गिक आपत्तीचा फटका बकऱयांच्या पैदासीवर झाला आहे. यामुळे बकऱयांची संख्या घटली. याचा परिणाम मटणाच्या दरावर झाला असून गेल्या चार महिन्यात प्रतिकिलो दरामध्ये 80 ते 100 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या बाजारपेठेत मटणाची वाटचाल 600 रुपयांकडे सुरु असून प्रतिकिलो दर 560 रुपये झाल आहे. मटणाच्या दरात जरी वाढ झाली असली तरी तांबडा-पांढराप्रेमी कोल्हापूरकरांमधून मटणाला मागणी कायम आहे. दरवाढीचा मटण विक्रीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे विक्रेत्यांमधून सांगितले जात आहे.

खवय्याप्रेमी अशी कोल्हापुरकरांची ख्याती, येथील तांबडा-पांढऱया बरोबरच झणझणीत मटण, चटकदार मिसळचा आस्वाद घेण्यासाठी जगभरातील पर्यटक कोल्हापूरात येतात. त्यामुळे पर्यटनाच्या कालावधीत शहरातील बहुतांश हॉटेलमध्ये तांबडया-पांढऱयाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांसह स्थानिकांची गर्दी असते. त्यामुळे कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये बकऱयांना मोठयाप्रमाणात मागणी आहे. मात्र सध्या बकऱयांची पैदास घटल्याने बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत बकऱयांचा पुरवठा कमी पडू लागल्याने मटणाच्या दरामध्ये वाढ होत चालली आहे. चार महिन्यांमागे 450 ते 480 रुपये किलो असलेला मटणाचा दर सध्या 560 रुपयांवर पोहचला आहे.

शहरातील बाजारपेठेत अटपाडी, जत, कराड, माडग्याळ, आतमी, पेठ वडगांव, मुंबई, कल्याण, चाकण, घोडेगाव, बडोज येथून बकऱयांची आवक होते. पाच ते आठ किलोपासून पुढे बकऱयांचे वजन असते. मात्र सध्या बकऱय़ांची आवक कमी झाल्याने बकऱयाच्या दरामध्ये प्रतिकीलो 40 रुपये तर एका बकऱयामागे सुमारे 500 ते 1000 रुपयांची वाढ झाली आहे. याचा परिणाम दरावर झाला आहे.

आवक कमी, दर वाढला

अतिवृष्टी, बकऱयांना झालेली साथीच्या रोगांची लागण यामध्ये मोठयाप्रमाणात बकरी मृत्यूमुखी पडली आहेत. यामुळे सध्या बकऱयांची संख्या कमी झाली आहे. शहरात मागणीच्या तुलनेत बकऱयांची आवक कमी झाल्याने दरामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यात मटणाच्या दरामध्ये प्रतिकीलो 80 ते 100 रुपयांची वाढ झाली आहे.

शाहरुख खाटीक, मटण विपेता.

Related posts: