मजूर पक्षावर हिंदू मतदार नाराज

ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणूक : समजूत काढण्याचे प्रयत्न गतिमान
वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटनमधील मजूर पक्षाने काश्मीर मुद्यावरून नाराज झालेल्या हिंदूंची समजूत काढण्याचे प्रयत्न गतिमान केले आहेत. 12 डिसेंबर रोजी होणाऱया सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाला मतदान न करण्याचे आवाहन हिंदूंना करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मजूर पक्षाचे नेते खडबडून जागे झाले आहेत. काश्मीर मुद्दय़ावर मजूर पक्षाने घेतलेल्या भूमिकेनंतर त्याचे भारतासोबतचे संबंध अत्यंत बिघडले आहेत.
मजूर पक्षाने 25 सप्टेंबर रोजी स्वतःच्या अधिवेशनात काश्मीरविषयक प्रस्ताव संमत केला होता. यात काश्मीर खोऱयात मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला होता. पक्षाच्या या पावलानंतर त्याच्यावर भारत तसेच हिंदूविरोधी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
प्रस्तावापासून राखले अंतर
पक्षाला देणगी देणाऱया एका मोठय़ा हिंदू नेत्याने टीका केल्यावर मजूर पक्षाने अधिवेशनात संमत प्रस्तावापासूनच अंतर राखले आहे. हिंदूंचा राग शांत करण्यासाठी मजूर पक्षाचे अध्यक्ष इयान लॉवरी यांनीच पुढाकार घेतला आहे. प्रस्तावामुळे भारतीय समुदाय दुखावला गेल्याचे जाणतो, असे त्यांनी म्हटले आहे.
भारतीयांकडून विरोध
ओव्हरसीज प्रेंड्स ऑफ भाजपच्या पदाधिकाऱयांनी जनसंपर्क मोहीम राबविली आहे. हे पदाधिकारी हुजूर पक्षासाठी मते मागत आहेत. अनेक हिंदुत्ववादी संघटनाही अशाचप्रकारे निवडणूक प्रचार करत आहेत. मजूर पक्षाच्या विरोधात तर हुजूर पक्षाच्या समर्थनार्थ ते सरसावले आहेत. .