|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » बांगलादेशात रेल्वेंची टक्कर, 16 जण ठार

बांगलादेशात रेल्वेंची टक्कर, 16 जण ठार 

दुर्घटनेत 60 हून अधिक जण जखमी

वृत्तसंस्था/ ढाका

 बांगलादेशच्या ब्रह्मनबरिया जिल्हय़ात मंगळवारी झालेल्या 2 रेल्वेगाडय़ांच्या धडकेत 16 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सिलहटरहून चितगाव येथे जात असलेल्या उद्यान एक्स्प्रेसची ढाक्याहून सुटलेल्या निशिता एक्स्प्रेसला मन्दोबाग स्थानकावर मंगळवारी पहाटे धडक बसली आहे.

लोकोमास्टरने सिग्नलचे पालन न केल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. दुर्घटनेच्या चौकशीसाठी 3 समित्यांची स्थापना करण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाचे सचिव मोफज्जल हुसैन यांनी सांगितले आहे. मृत प्रवाशांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.

12 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून 4 जणांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. दुर्घटनास्थळी बचावमोहीम सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. अनेक जण अद्याप दुर्घटनाग्रस्त डब्यांमध्ये अडकून पडल्याची माहिती अखौरा रेल्वेस्थानकाचे प्रभारी शामलाल दास यांनी दिली आहे.

रेल्वेमार्ग बदलताना दुर्घटना

उद्यान एक्स्प्रेसचा रेल्वेमार्ग बदलला जात असताना तिची दुसऱया एक्स्प्रेसला धडक बसली आहे. रेल्वेमंत्री नरुल इस्लाम सूजन आणि वरिष्ठ अधिकाऱयांनी दुर्घटनास्थळी धाव घेत बचावकार्याची माहिती जाणून घेतली आहे. संबंधित रेल्वेंच्या चालकांना निलंबित करण्यात आले आहे. बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दुल हामिद, पंतप्रधान शेख हसीना आणि संसदेचे अध्यक्ष शिरीन चौधरी यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

Related posts: