|Monday, December 16, 2019
You are here: Home » क्रिडा » दीपक चहर नव्हे एकता बिश्त भारताची पहिली हॅट्ट्रिकवीर

दीपक चहर नव्हे एकता बिश्त भारताची पहिली हॅट्ट्रिकवीर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बांगलादेशविरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या शेवटच्या टी-20 सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवल्यानंतर वेगवान गोलंदाज दीपक चहर चर्चेचा विषय बनला होता. टी-20 क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक नोंदवणारा तो पहिला भारतीय असल्याचे सर्वांनीच वृत्त दिले होते. पण प्रत्यक्षात हा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. पुरुषांमध्ये मात्र तो पहिला हॅट्ट्रिकवीर आहे. याआधी महिला क्रिकेटपटू एकता बिश्तने 2012 मध्येच लंकेविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवली होती. त्यामुळे भारतातर्फे पहिली हॅट्ट्रिक नोंदवण्याचा बहुमान तिला प्राप्त होतो.

नागपूरमधील सामन्यात बांगलादेश 175 धावांचा पाठलाग करीत असताना राजस्थानच्या दीपक चहरने 3.2 षटकांत केवळ 7 धावा देत हॅट्ट्रिकसह 6 बळी मिळविले. त्याने लंकेच्या अजंथा मेंडिसचा 8 धावांत 8 बळी घेण्याचा विक्रम मागे टाकला होता. मेंडिसने 2012 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हा विक्रम केला होता. हॅट्ट्रिक नोंदवणारा भारताचा पहिला पुरुष गोलंदाज होण्याचा मान चहरला मिळाला आहे. त्याच्याआधी फिरकी गोलंदाज एकता बिश्तने 2012 मध्ये लंकेविरुद्ध झालेल्या महिलांच्या आयसीसी टी-20 विश्वचषक पात्रता स्पर्धेतील सामन्यात भारतातर्फे पहिली हॅट्ट्रिक नोंदवली होती. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने लंकेवर त्यावेळी 9 गडय़ांनी विजय मिळविला होता आणि बिश्तला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा मानही मिळाला होता. तिने 16 धावांत 3 बळी मिळविले होते. एकताने दौलानी सुरंगिका, यसोदा मेंडिस, इशानी कौशल्या यांना सलग तीन चेंडूवर बाद केले होते.

Related posts: