|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » लिंब खिंडीत परप्रांतिय कामगाराचा खून

लिंब खिंडीत परप्रांतिय कामगाराचा खून 

प्रतिनिधी/ सातारा

लिंबखिंड, नागेवाडी, ता. सातारा येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास एका परप्रांतीय कामगाराचा खून झाल्याचे सकाळच्या सुमारास समजताच या सर्व परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, खून करणारा संशयित पसार झाला होता व तो त्या कामगारांचा नात्याने भाचा होता.  तातडीने तपासाची सुत्रे हलवत त्याला सातारा तालुका पोलिसांनी लोणावळा जि, पुणे येथून ताब्यात घेतले आहे.

 याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लिंबखिंड येथील जाधव यांच्या क्रशर मशीनवर कामास असणाऱया डब्लूकुमार रामसुंदर सिंह (वय 38, राणाबिहाग पटना, राज्य बिहार) याचा रात्रीच्या सुमारास डोक्यामध्ये अज्ञात हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आला आहे. या घटनेची सातारा तालुका पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर संशयिताचा शोध घेण्यास प्रारंभ केला.

याबाबत खडी क्रशरचे व्यवस्थापक शरद तानाची मोरे (वय 32 रा. देगावरोड, सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. डब्लूकुमार सिंह हा सोमवारी रात्रीच्या सुमारास कन्हैयाकुमार हवारी हे दोघे विक्रम जाधव यांच्या क्रशर मशीनवर कामगार आहेत, दोघेही बिहार राज्यातील असून दोघे नात्याने मामा भाचे आहेत. सोमवारी सायंकाळी कामावरून सुटल्यानंतर त्यांचा पगार झाला होता. रात्रीच्या वेळी दोघांनी भरपूर दारु पिली होती. त्यांच्यामध्ये काही कारणाने भांडण झाल्याने संशयित आरोपी कन्हैयाकुमारने डब्लूकुमार याला डोक्यात अज्ञात हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. गंभीर जखमी झालेल्या डब्लूकुमार याचा जागेवरच मृत्यू झाला. डब्लूकुमार याचा भाचा कन्हैयाकुमार याच्यावर तक्रारीत संशय व्यक्त करण्यात आला होता. 

 त्यानुसार माहिती घेऊन पोलीस संशयित आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मार्गस्थ केले. पोलीस निरीक्षक हंकारे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी  पथक आरोपीच्या शोधार्थ रवाना केले. संशयित कन्हैयाकुमार हा रेल्वेने प्रवास करत पसार होत असल्याचे  लोकेशनवरुन कळत होते. पोलीस हवालदार राजू मुलाणी, सुजित भोसले, रमेश चव्हाण, दादा परिहार यांनी संशयित आरोपी कन्हैयाकुमार हवारी यास लोणावळा, जि. पुणे येथील रेल्वे स्थानकवरून ताब्यात घेतला. या गुह्याचा तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत. 

वरिष्ठांकडून पोलीस पथकाचे अभिनंदन

खून केल्यानंतर फरार झालेल्या संशयित आरोपीस काही तासातच पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेतल्याबद्दल त्यांचे व  पोलीस हवालदार राजू मुलाणी, सुजित भोसले, रमेश चव्हाण, दादा परिहार यांचे जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील व सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले.

Related posts: