|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पुण्याच्या विकास स्टुडीओच्या डिझाईनला प्रथम क्रमांक

पुण्याच्या विकास स्टुडीओच्या डिझाईनला प्रथम क्रमांक 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा नगर परिषदेच्या नियोजित प्रशासकीय इमारतीच्या संकल्प रेखांकनासाठी घेण्यात आलेल्या ‘आयकॉनिक सातारा’ या वास्तू विशारदांच्या देश पातळीवरील स्पर्धेत पुणे येथील आर्किटेक्ट कल्पक भंडारी, आर्कि. जयंत धरप व आर्कि. विनोद धुसिया यांच्या विकास स्टुडिओ या कंपनीला प्रथम क्रमांक मिळाला तर द्वितीय क्रमांक पुण्याच्या डिझाईन कॉडसला व नाशिक येथील कॉज ऍन इनिशिएटिव्ह कंपनीच्या डिझाईनला मिळाला. यावेळी विजेत्यांचा सत्कार सन्मानचिन्ह, धनादेश व पुष्पगुच्छ देऊन माजी खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले, आ.श्री. छ. शिवेंद्रसिंहाराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेतील विजेता, उपविजेता व तृतीय क्रमांकाला स्मृतीचिन्ह व अनुक्रमे रु. अडीच लाख, दीड लाख व एक लाखाचे इनाम दिले गेले. 

यावेळी श्री.छ. विक्रमसिंहराजे भोसले, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, मुख्याधिकारी शंकर गोरे, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्टस्चे महाराष्ट्र चे अध्यक्ष सतिश माने, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, सातारा सेंटरचे अध्यक्ष मयुर गांधी, सेकेटरी विपुल साळवणकर, स्पर्धेतील निवड समितीचे सदस्य नामवंत वास्तूविशारद नितीन किल्लावाला, चंद्रशेखर कानेटकर व संजय पाटील, नगरसेवक-नगसेविका, राज्यातुन आलेले आर्किटेक्टस्, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी स्पर्धेतील सर्वोत्तम 12 आराखडय़ांचा समावेश असलेले कॉफीटेबल बुक चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी बोलताना श्री.छ. उदयनराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आजयर्पंत होऊन गेलेले सर्वात मोठे वास्तुविशारद होते. छ. शिवरायांच्या तीनशे किल्ल्यांची वास्तुशैली ही वेगवेगळी आहे.  आयकॉनिक सातारा च्या माध्यमातून साकारणार्या नवीन नगर परिषदेच्या इमारतीमुळे सातारा शहराची नवीन ओळख संपुर्ण जगाला होईल या शंका नाही. ऐतिहासिक, निसर्गसंपन्न व पर्यटन क्षेत्रामुळे नावलौकिक मिळवलेला सातारा आता आयकॉनिक सातारा ही ओळख संपादन करेल. ही  इमारत साकारण्यासाठी  जमीन नाममात्र किंमतीत दिलेल्या बाबासाहेब कल्याणी यांचे विशेष योगदान यामध्ये राहिलेले आहे. 

यावेळी बोलताना आमदार श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, सातारा नगर परिषदेची नवीन इमारत साकारण्यासाठी आर्किटेक्ट असोसिएशन व नगर परिषद यांनी खरेच मोलाचे प्रयत्न केले आहेत. या स्पर्धेत 200 हून अधिक वास्तुविशारदांनी नोंदणी करून 118 जणांनी आपले रेखांकन परिक्षण सादर केले. या स्पर्धेसाठीचा येणारा सर्व खर्च आय. आय. ए. सातारा शाखेने स्वताच्या गंगाजळीतून व प्रायोजकांच्या मदतीने केला आहे. आयकॉनिक सातारा बरोबरच शहर व परिसरातील अनेक प्रकल्पांना आर्किटेक्ट असोसिएशनचे नेहमीच सहकार्य राहिल व त्यातून आधुनिक सातारा ही नवीन ओळख सातारा निर्माण करेल.

नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी मनोगत व्यक्त केले. आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष मयुर गांधी यांनी प्रास्ताविक केले व या स्पर्धेचा हेतु विशद केला. यावेळी आर्कि. ययाति टपळे, महेंद्र चव्हाण, विपुल साळवणकर, सुहास तळेकर, सुधीर शिंदे, श्री. महाजनी, उपेंद्र पंडित यांनी मान्यवरांचा सत्कार केला. आर्किटेक्ट सुहास तळेकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे निटनेटके सूत्रसंचालन सौ. स्नेहल दामले यांनी केले. 

  परीक्षकांनी निवडलेल्या निवडक 32 इमारत आराखडय़ांचे प्रदर्शन जनतेस पाहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या   यशवंतराव चव्हाण सभागृह स्थळी  13 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत  जनतेस पाहण्यासाठी विनामुल्य खुले ठेवले आहे

Related posts: