|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » काँग्रेस-शिवसेनेत नवे संवादपर्व !

काँग्रेस-शिवसेनेत नवे संवादपर्व ! 

अहमद पटेल-उध्दव ठाकरे यांची भेट

काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंशी केली चर्चा

नव्या राजकीय समीकरणाची नांदी

मुंबई / प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात कालपर्यंत एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱया काँग्रेस आणि शिवसेनेत संवादाचे नवे पर्व सुरू झाले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची झालेली भेट, राज्यातील काँग्रेस नेत्यांनी ठाकरे यांच्याशी केलेली चर्चा यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-शिवसेना एकत्र येण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याचे मानले जाते.

उध्दव ठाकरे यांनी 11 नोव्हेंबर रोजी सोनिया गांधींशी फोनवरून संपर्क साधला होता. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी आपण पाठिंबा द्यावा, असा अधिकृत प्रस्ताव ठाकरे यांनी काँग्रेसश्रेष्ठींसमोर ठेवला. सोनियांनीही ठाकरे यांना तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत शिवसेनेच्या

प्रस्तावावर सखोल चिंतन केल्यानंतर सोनियांनी आपले खास विश्वासू अहमद पटेल यांना मुंबईत पाठवले. मंगळवारी मुंबईत आल्यानंतर पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. दोन्ही काँग्रेसची सकारात्मक चर्चा झाल्यानंतर पुढे हालचाली वाढल्या.

नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी अहमद पटेल आणि उध्दव ठाकरे यांची बुधवारी पहाटे हॉटेल ट्रायडंटमध्ये भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. दोघांमधील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये सत्तास्थापनेच्या संदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. 1999 पासून महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारची स्थापना, दोन्ही काँग्रेसची आघाडी आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री निवडण्यात अहमद पटेल यांची भूमिका निर्णायक राहिली आहे. यापार्श्वभूमीवर पटेल-ठाकरे भेट महत्त्वाची मानली जाते.

ठाकरेंची काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा

दरम्यान, आज उध्दव ठाकरे आणि राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे तर शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. आमची काँग्रेससोबतची चर्चा योग्य दिशेने सुरू आहे. लवकरच निर्णय कळेल, असे ठाकरे यांनी बैठकीनंतर सांगितले. तर नव्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आम्ही ठाकरे यांची भेट घेतल्याचे थोरात म्हणाले.

Related posts: