सांगलीचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर

प्रतिनिधी / सांगली
महापालिकेचे पुढील अडीच वर्षाचे आरक्षण सर्वसाधारण खुल्या प्रवर्ग या घटकाचे जाहीर झाले आहे. मुंबई येथे मंत्रालयात राज्यातील 27 महापालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने काढण्यात आले. त्यामध्ये सांगली महापालिकेचे आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2021 पासून पुढील अडीच वर्ष हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण लागू राहणार आहे. पण या आरक्षणांचा लाभ भाजपामधील नेत्यांच्याच मुलांना होणार आहे. त्यामुळे सामान्य नगरसेवकाला हा महापौर पदाचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे.
सध्या महापालिकेत भाजपाची एक हाती सत्ता आहे. एकूण त्यांचे संख्याबळ 43 इतके आहे. पण यामध्ये अनेक गटाची सत्ता आहे. त्यामुळे कोअर कमिटी सदस्यांच्या मुलांनाच यामध्ये प्राधान्य मिळण्याची शक्यता जास्त आहे. कोअर कमिटी सदस्य माजी स्थायी समिती सभापती सुरेश आवटी यांचे सुपुत्र निरंजन आवटी, माजी स्थायी समिती सभापती दिलीप सूर्यवंशी यांचे पुतणे धीरज सूर्यवंशी, माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्य पाटील, सध्याचे भाजपाचे गटनेते युवराज बावडेकर, भाजपाच्या नगरसेविका सौ. भारती दिगडे, सौ. स्वाती शिंदे, सुनंदा राऊत यांचाही या महापौरपदासाठी दावा असण्याची शक्यता आहे.
सध्याचे महापौरपद हे ओबीसी महिला राखीव आहे. आणि ते मिरजेकडे आहे. विद्यमान महापौर सौ. संगीता खोत यांना पहिले सव्वा वर्ष संधी देण्यात आली आहे. त्यानंतर ही संधी सांगलीच्या ओबीसी प्रवर्गाच्या महिला गटाला मिळणार आहे. त्यानंतर पुन्हा संधी मिरजेकडे जाणार आहे. त्यामुळे सुरेश आवटी यांचे सुपुत्र निरंजन आवटी हे या पदासाठी सर्वात प्रबळ दावेदार आहेत. त्यादृष्टीनेच सध्याची पावले टाकली जात आहेत. त्यासाठी महापालिकेत कोअर कमिटी सदस्यांवर सुरेश आवटी यांनी वचक ठेवला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समिती सभापतीवेळीही त्यांनी खेळलेली राजकारणाची खेळीही अशीच होती. स्थायी समिती सभापतीपदाची संधी मिरजेकडे गेल्यानंतर आपसुकच त्यांचे सुपुत्र संदीप आवटी यांना या सभापती पदाची लॉटरी लागली आहे. आता सव्वा वर्षानंतर महापौरपदाची संधी आपल्याकडे कशी येईल याचीच त्यांनी तयारी सुरू ठेवली आहे.
दरम्यान महापौरपदाचे आरक्षण जरी सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी जाहिर झाले असले तरी येणाऱया सव्वा वर्षात महापालिकेत रंगणारे राजकारण आणि राज्यात होणारा सत्ताबदल याचाही परिणाम या महापौर पदाच्या निवडीवर परिणाम निश्चित होवू शकतो. कारण भाजपामधील अनेक नगरसेवक हे भाजपाच्या कार्यपध्दतीवर नाराज आहेत. त्यांच्यामध्ये धुसफुस सुरू आहे. कोअर कमिटी सदस्यांची प्रत्येक कामात असणारी ढवळाढवळ यामुळे हे नगरसेवक वैतागले आहेत. त्यामुळे येत्या सव्वा वर्षात बदलणारे राजकारण ही या निवडीवर विपरित परिणाम करू शकते. त्यामुळे सध्या तरी भाजपामधील नेत्यांच्या मुलांना महापौर होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. आणि या महापौरपदासाठी जोरदार चुरस होण्याची दाट शक्यता आहे.