|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कुपवाडमध्ये गुन्हेगाराचा गुन्हेगाराकडून खून

कुपवाडमध्ये गुन्हेगाराचा गुन्हेगाराकडून खून 

प्रतिनिधी / कुपवाड

कुपवाडमधील अहिल्यानगर येथे एका गुन्हेगाराचा गुन्हेगाराकडूनच डोक्यात दगड घालून खून केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी सकाळी उघड़कीस आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संशयिताने मृतदेहाच्या कमरेला दगड बांधून एका पडक्या विहीरीत टाकण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली असून पोलिसानी दोन तासात एका संशयितास अटक केली आहे.

यामध्ये श्रेयस सतीश कवठेकर (22, रा. उमेदनगर, कुपवाड) असे खून झालेल्याचे तर रोहीत उर्फ दादया सुदाम कदम (25, रा. अहिल्यानगर, कुपवाड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. दरम्यान, या गुन्हयात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याबाबत पोलिस सखोल तपास करीत आहेत.

दरम्यान, मयत आणि संशयित हे दोघेही चांगले मित्र होते. संगनमताने दोघेही चोऱया, घरफोडी करत होते. ते पोलिस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून दोघांवर कुपवाड, संजयनगर, विश्रामबाग, सांगली शहर, मिरज शहर व गांधीचौकी पोलिस ठाण्यात घरफोडी, चोऱया तसेच रिव्हॉल्वर बाळगणे, याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

मयत श्रेयस हा रोहीतच्या गैरकृत्याच्या पोलिसांना सतत टिप दिल्याच्या रागातून रोहीतने खून केल्याचे उजेड़ात आले. रोहितने श्रेयसला 4 नोव्हेंबर रोजी दुचाकीवरुन गायब केले. अहिल्यानगरमध्ये आड़मार्गाला नेऊन गांजा पाजला. श्रेयसला नशा झाल्यावर रोहीतने त्याच्या डोक्यात दगड घालून ठार मारले आणि कमरेला दगड बांधून मृतदेह पडक्या विहिरीत फेकला, अशी माहिती तपासाधिकारी सपोनि नीरज उबाळे यांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून संशयित रोहीत कदम यास अटक केल्याचेही पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत श्रेयस कवठेकर व संशयित रोहीत कदम दोघे मित्र होते. त्यांनी आतापर्यंत कुपवाड, विश्रामबाग, गांधीचौकी, संजयनगर, सांगली व मिरज शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेकठिकाणी घरफोड़य़ा केल्या आहेत. त्याच्या विरोधात घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. ते दोघे दुचाकीवरुन 4 नोव्हेबर रोजी सांगलीकडे गेले. त्यानंतर श्रेयस घरी परतलाच नाही. घरातून गायब झाल्याने श्रेयसच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. पण, सापडला नाही. त्यामुळे 8 रोजी श्रेयस बेपत्ता झाल्याची कुपवाड पोलिसात आजोबा लक्ष्मण देवाप्पा कवठेकर यांनी फिर्याद दिली. त्या अनुशंगाने पोलिसानी तपास सुरु केला.

बुधवारी सकाळी अहिल्यानगर जवळील संजय इंडस्ट्रीयल इस्टेटमधील एका खत कंपनीच्या गोदामासमोरील एका पडक्या विहिरीत तरुणांचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. त्यानुसार मिरजेचे पोलिस उपाधीक्षक संदीपसिंग गिल, सपोनि नीरज उबाळे यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हेल्पलाईन इमरजन्सी रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. सदरचा मृतदेह रेकॉर्डवरील गुन्हेगार कवठेकर याचा असल्याचे तसेच त्याला मारहाण करून कमरेला दगड बांधून विहिरीत फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

पोलिसानी गुह्यात वापरलेला दगड जप्त केला. ओळख पटवून घेण्यासाठी पोलिसांनी नातेवाईकांना पाचारण केले. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह मिरजेच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला. घटनास्थळी बघ्यानी प्रचंड गर्दी केली होती.

शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर खूनाचा गुन्हा दाखल करुन रेकॉर्डवरील गुन्हेगाराची माहिती घेण्यात आली. पोलिस तपासात रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहीत कदमचे नाव निष्पन्न झाले. त्यादिशेने तपास करून पोलिसानी संशयित रोहीतला दोन तासात पकडले. पोलिसी खाक्या दाखवताच श्रेयसचा खून केल्याची रोहितने कबूली दिली. त्यानुसार रोहितवर अटकेची कारवाई करण्यात आली. तपास सहा. निरीक्षक नीरज उबाळे करीत आहेत.

सलग दोन खून

सलग दोन खून झाल्याने सांगलीसह उपनरात खळबळ माजली आहे. अहिल्यानगर (कुपवाड) येथील श्रेयस कवठेकरचा खून वाटणीच्या कारणावरुन झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. तर नेमिनाथनगर येथील मैदानावर भोसकण्यात आलेल्या बसवराजचा खूनही वर्चस्ववादातून झाल्याचे समोर येत आहे. दोन्हीही खून जवळच्याच मित्रांनीच केल्याने ‘मैत्री’ च्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related posts: