|Thursday, December 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » केजरीवाल सरकारला ‘सर्वोच्च’ नोटीस

केजरीवाल सरकारला ‘सर्वोच्च’ नोटीस 

सम-विषम योजनेच्या निर्णयाबद्दल मागितली माहिती : वायू गुणवत्ता निर्देशांकाची आकडेवारी द्यावी लागणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीत सम-विषम योजना लागू करण्याच्या निर्णयासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने  केजरीवाल सरकारला पुन्हा नोटीस बजावली आहे. न्यायालयाने दिल्ली सरकार तसेच केंदीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला (सीपीसीबी) 1 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीतील वायू गुणवत्ता निर्देशांकाची (एक्यूआय) आकडेवारी सादर करण्यास सांगितले आहे. तसेच मागील वर्षाच्या 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीतील एक्यूआय आकडेवारीही मागविली आहे.

वकील संजीव कुमार यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्देश दिला आहे. प्रदूषणसंबंधी निर्णयाचा राजकीय लाभ घेण्याचा केजरीवाल सरकारचा प्रयत्न सामान्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. दिल्लीत 4 नोव्हेंबरपासून सुरू झालेली सम-विषम योजना 15 तारखेपर्यंत चालणार आहे.

प्रदूषणाची गंभीर स्थिती

दिल्ली-एनसीआर आणि नजीकच्या भागांमध्ये बुधवारी सकाळी वायू प्रदूषण पुन्हा धोकादायक स्तरावर पोहोचले आहे. दिल्लीच्या लोधी मार्ग भागात पीएम-2.5 ची पातळी 500 तर पीएम-10 ची पातळी 497 अंकांवर पोहोचली असून हे प्रमाण अत्यंत धोकादायक मानले जाते. आरके पुरममध्ये वायू गुणवत्ता निर्देशांक 447 च्या पातळीवर पोहोचला आहे.

राज्य सरकारचा दावा

दिल्लीत सम-विषम लागू केल्यावर प्रदूषणात घट झाल्याचा दावा केजरीवाल सरकारने केला आहे. सम-विषम योजना यशस्वी व्हावी, याकरता 5 हजार स्वयंसेवक तसेच 400 पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्य परिवहनच्या 5600 बसेस रस्त्यांवर धावत असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.

एक्यूआयचे मापदंड

वायू गुणवत्ता निर्देशांक 0-50 दरम्यान राहिल्यास ‘उत्तम’, 51-100 दरम्यान राहिल्यास ‘समाधानकारक’, 101-200 दरम्यान राहिल्यास ‘सरासरी’, 201-300 दरम्यान राहिल्यास ‘खराब’, 301-400 दरम्यान राहिल्यास ‘अत्यंत खराब’ आणि 401-500 दरम्यान राहिल्यास ‘गंभीर’ मानले जाते. तर हवेत पीएम 10 ची पातळी तर पीएम 2.5 ची पातळी 60 मायक्रोगॅम प्रतिचौरस मीटरपेक्षा अधिक  असू नये.

400 एक्यूआयमध्ये प्राणवायू अल्प

वायू प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास होतो. एक्यूआय 400 वर पोहोचल्यास प्राणवायूचे प्रमाण कमी होत जाते. या स्थितीमुळे विविध संसर्ग, ब्रॉनकायटिसचा आजार बळावतो. धूळयुक्त धुक्यामुळे डोळय़ांची जळजळ सुरू होते.

हायड्रोजन आधारित इंधन

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने प्रदूषणाच्या धोकादायक पातळीची दखल घेत केंद्र सरकारला हायड्रोजन आधारित इंधनाच्या वापराचा पर्याय शोधण्याची सूचना केली आहे. देशात, विशेषकरून राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात प्रदूषणाची पातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने उपाय योजावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Related posts: