|Sunday, December 8, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » जेएनयू विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

जेएनयू विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश 

शुल्कवाढीचा निर्णय प्रशासनाने अखेर घेतला मागे : विद्यार्थ्यांना वर्गात परतण्याचे आवाहन

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली 

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वसतिगृहाच्या शुल्कवाढीच्या विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. प्रशासनाने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुल्कामध्ये कपात करण्याचा आदेश देत विद्यार्थ्यांना वर्गात परतण्याचे आवाहन केले आहे. शिक्षण सचिव आर. सुब्ा्रमण्यन यांनी ट्विट करत कार्यकारी समितीने वसतिगृह शुल्क तसेच अन्य नियमांशी संबंधित शुल्कात मोठी कपात केल्याची माहिती दिली आहे.

विद्यापीठाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करण्याशी संबंधित योजनेचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या निदर्शनांचा अडथळा होण्याची शक्यता पाहता विद्यापीठ प्रशासनाने कार्यकारिणी परिषदेची बैठक परिसराच्या बाहेर आयोजित केली होती. कार्यकारिणी परिषद ही जेएनयूची सर्वात मोठी नियामक संस्था आहे.

विद्यार्थ्यांनी सोमवारी एआयसीटीए भवनाच्या बाहेर निदर्शने केली होती. या भवनात जेएनयूचा दीक्षांत विधी सुरू होता. या निदर्शनांमुळे मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक हे 6 तास आतमध्ये अडकून पडले होते.

विद्यार्थ्यांची मागणी

वसतिगृह विषयक नियमांचा मसुदा मागे घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. या मसुद्यानुसार वसतिगृह कक्षाचे भाडे अनेक पटीने वाढविले जाणार होते. तसेच अतिरिक्त अतिथीला रात्री 10.30 नंतर वसतिगृहातून बाहेर काढण्याची तरतूद प्रस्तावित होती. तर युवकांच्या खोलीत युवती तर युवतीच्या कक्षात कुठल्याही युवकाच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. वसतिगृहाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास 10 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद ठेवण्याचा प्रस्ताव नमूद होता.

अभाविपचा पाठिंबा

जेएनयूचे विद्यार्थी वसतिगृहाच्या शुल्कवाढीच्या विरोधात बुधवारीही रस्त्यांवर उतरले होते. त्यांना डाव्यांच्या विद्यार्थी संघटनेचा पाठिंबा प्राप्त झाला. तर संघाची विद्यार्थी संघटना अभाविपनेही विद्यार्थ्यांना समर्थन दिले आहे. अभाविप कार्यकर्त्यांनी युजीसी भवनासमोर निदर्शने केली आहेत. 

Related posts: