|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » डॉ. दीपक निकम झाले 61 व्या वर्षी आयर्नमॅन

डॉ. दीपक निकम झाले 61 व्या वर्षी आयर्नमॅन 

विजय जाधव/ गोडेली

नियमित व्यायाम करा असा 35 वर्षे रुग्णांना सल्ला देणारे डॉक्टर स्वतः मात्र वयाच्या 58 व्या वर्षी नुसता 1 किलोमीटर चालण्याचा व्यायाम न करणारांपैकी सातारचे डॉ. दीपक निकम आहेत. याच डॉक्टरांनी 58 व्या वर्षी व्यायामाला सुरूवात केली आणि अवघ्या तीन वर्षात नियमित व्यायामाला सुरूवात करत गगणाला गवसणी घालणारे विक्रम करून दाखवले. वयाच्या 61 व्या वर्षी 2 किलोमीटर स्वीमिंग, 90 किलोमीटर सायकलींग, 21 किलोमीटर धावण्याच्या राष्ट्रीय स्तरावरील गोवा 70.3 हाफ आर्यनमॅन स्पर्धा अवघ्या 8 तास 17 मिनिटांत पूर्ण करून तिसरा क्रमांक पटकावून सर्वांना थक्क केले. त्यांची स्वित्झलंडमध्ये होणाऱया वर्ल्ड चॅम्पियन 2020 साठी निवड झाली आहे. आता देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळालेल्या सातारकर डॉ. दीपक निकम यांनी वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार असल्याचे ‘तरुण भारत’ शी बोलताना आत्मविश्वाने सांगितले.

  आयुष्यातील 35 वर्षे वैद्यकिय व्यवसाय केला. प्रत्येक रुग्णाला औषधोपचारा बरोबर व्यायामाचे महत्व सांगणारे डॉ. दीपक निकम यांनी स्वतः 100 पावले चालण्याचा कधीच व्यायाम केला नाही. दि. 3 जून 2017 ला सातारमध्ये राहण्यास आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ग्राऊंडवर फिरण्याचा झेडपी मॉर्निंग ग्रुपबरोबर व्यायामाला सुरूवात केली. प्रथम हळूहळू चालण्याचा, धावण्याचा सराव केला. 1 किलोमीटर धावत पुढे काही महिन्यात 21 किलोमीटरपर्यंत धावण्यापर्यंत मजल मारण्याचा सराव झाला. यातून 2 वर्षात तब्बल 55 हाफ मॅरेथॉन पूर्ण केल्या. यात 11 स्पर्धेत 1 ते 3 क्रमांक पटकावण्याचा पराक्रम करून नियमित सराव करणाऱया सहकाऱयांना अचंबित केले आहे. पुढे वयाच्या 61 व्या वर्षी आयर्नमॅन होण्याची स्वप्ने पाहणे धोकादायक असते, त्याच वयात आयर्नमॅनसाठी सराव सुरू केला. पहाटे 4:30 ला उठणे, 20 ते 30 किलोमीटर सायकलिंग, 10 किलोमीटरपर्यंत धावणे, 2 किलोमीटरपर्यंत पोहणे हे ऊन, वारा, पावसाची तमा न करता एक ही दिवस खंड न पडता गेली तीन वर्षे व्यायाम करतात.

  दि. 20 ऑक्टोंबर 2019 रोजी गोवा येथे गोवा 70.3 आयर्न मॅन ट्रायथलॉन जागतिक दर्जाच्या स्पर्धेत वयाच्या 61 व्या वर्षी सहभाग घेतला. यापुर्वी या स्पर्धेची प्रचंड आत्मविश्वासाने सराव केला. कोणाचे सल्ला, मार्गदर्शन नसताना 25 ते 40 वयातील सहकाऱयांच्या सोबत नियमित अखंड सराव केला. प्रत्यक्ष स्पर्धेपुर्वी गोव्यात चार दिवस आधी जाऊन सराव करताना मुसळधार पाऊस, प्रचंड वारा आणि समुद्राच्या धडकी भरविणाऱया लाटांनी मनाचा थरकाप उडाला होता. मात्र स्वतःचा आत्मविश्वास आणि स्पर्धा पूर्ण करण्याचा निर्धार पक्का होता. प्रत्यक्षात स्पर्धा सुरू होताना एकाचवेळी तब्बल 1000 हून अधिक जणांनी पोहण्यासाठी उडय़ा मारल्या, एकमेकांना लाथा, ढकला ढकली करत प्रत्येक जण पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यात क्षणोक्षणी लाटा अडव्या येत होत्या तर मासे चावा घेत परीक्षा घेत होते. सर्वस्व पणाला लावून 2 किलोमीटर पोहणे पूर्ण केल्यावर 90 किलोमीटर सायकलिंग करताना मोठी परीक्षा कसोटी पार केली. नंतर 21 किमी पळताना जीवाचे रान केले. यावेळी कुटुंब, मित्रांनी चेअEिरग  दिलेली प्रेरणा, ऊर्जा वाढवत होती. शेवटच्या क्षणापर्यंत जिंकण्याचा निर्धार टिकल्याने या स्पर्धेतील 60 ते 64 वयोगटातील 3 क्रमांक पटकावला. या यशाने स्वित्झर्लंडमध्ये होणाऱया वर्ल्ड चॅम्पीयन 2020 साठी निवड झाली.

  सातारा शहरात गेल्या काही वर्षापासून धावणे, सायकलिंग, पोहण्याचे वेड लागले अनेक जण दिसतात. यात मात्र डॉ. निकम यांच्यासारख्या असून जेष्ट पण युवापिढी समोर आदर्श निर्माण केला आहे. स्वित्झर्लंडमध्ये होणाऱया वर्ल्ड चॅम्पीयन स्पर्धेसाठी कसून सराव सध्या सुरू आहे. त्यासाठी झेडपी मॉर्निंग ग्रुप मधील मित्र प्रेरणा देत असून अनेक सातारकरांच्या शुभेच्छा पाठींशी असल्याने आपण या स्पर्धेत नक्कीचं यशस्वी होऊ, असे ‘तरुण भारत’ शी बोलताना सांगितले.

Related posts: