आमदार बच्चू कडू पोलीसांच्या ताब्यात

ऑनलाइन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आमदार बच्चू कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज, राजभवनावर मोर्चा काढला आहे. मात्र राजभवनावर पोहचण्यापूर्वीच राजभवनावर जाणारा हा धडक मोर्चा पोलिसांनी अडवला आहे. व पोलिसांनी आमदार बच्चू कडू यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र तरीही मोर्चा काढण्यात आला होता .
महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱयांच्या नुकसानाचे पंचनामे व्हावेत तसंच शेतकऱयांना मदत जाहीर करण्यात यावी अशा अनेक मागण्यासाठी मोर्चा काढला जात होता. यावेळी मोठय़ा प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. तसंच आंदोलकांनी पोलिसांची गाडीच अडवून ठेवण्याचा प्रयत्न केला.
बच्चू कडू म्हणाले, आता आम्हांला आझाद मैदानावर नेले जात आहे. मात्र त्यानंतर आमचा मोर्चा चालूच रहाणार आहे. आपण पुढच्या वेळी आंदोलन करताना काहीही न सांगता थेट पोहोचू असा इशाराही दिला. सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱयांना मदत करणार नाही का ? असा सवालही बच्चू कडू यांनी विचारला आहे.