|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » मावळातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करणार

मावळातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करणार 

 लोणावळा / प्रतिनिधी :

मावळ तालुक्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस नवनीत काँवत यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

याबाबत बोलताना काँवत म्हणाले, माझ्या कार्यकक्षेत वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा ग्रामीण व लोणावळा शहर ही चार पोलीस ठाणी येतात. पूर्वी याठिकाणी काय चालायचे, मला माहिती नाही. मात्र, आता या भागात कोठेही अवैध धंद्यांना स्थान दिले जाणार नाही. मावळ उपविभागाची माहिती घेताना कामशेत व वडगाव पोलीस ठाणे हद्दीत तसेच हायवे लगतच्या अनेक हॉटेल व धाबे येथे बनावट तसेच विना परवाना दारू विक्री केली जाते. काही ठिकाणी मटके, जुगारचे क्लब, पर्यटनस्थळांवर अंमली पदार्थ विक्री असे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱयांना तातडीने हे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनीही आपल्या आजुबाजूला कोठेही अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ लोणावळा उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. कोणाचीही गय केली जाणार नाही. माझ्या कार्यकाळात व माझ्या कार्यकक्षेत कोठेही अवैध व्यवसाय चालणार नाहीत, याचा नागरिकांनी विश्वास बाळगावा. पोलीस कर्मचाऱयांकडून गैरवर्तन होत असल्यास खबर करावी, प्रत्येक तक्रारीची शहनिशा करुन दखल घेतली जाईल, असे काँवत यांनी सांगितले. काँवत हे 2017 सालच्या बॅचचे टॉपर आयपीएस अधिकारी असून लोणावळय़ात त्यांची पहिलीच पोस्टिंग आहे.

Related posts: