|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » चित्रपटाशी संबंधित उपक्रम व कलाकारांना प्रोत्साहन गरजेचे

चित्रपटाशी संबंधित उपक्रम व कलाकारांना प्रोत्साहन गरजेचे 

पुणे / प्रतिनिधी :  

मी मुख्यमंत्री असताना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विविध उपक्रम राबविले. यामागे स्थानिक कलाकारांना गोव्यामध्येच अधिकाधिक संधी मिळावी, हा हेतू होता. महाराष्ट्रासह गोव्यामध्ये आजही चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टी होतात. त्यामुळे चित्रपटाशी संबंधित उपक्रम राबविणे आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्याची गरज असून गोव्यामध्ये मनोरंजन उद्योगासाठी मोठा वाव आहे, अशी भावना गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली. 

पुण्यातील मराठी चित्रपट परिवार आणि अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित सहाव्या गोवा लघुपट महोत्सवाचे उद्घाटन गोव्यातील पणजी येथील संस्कृती भवन येथे दिगंबर कामत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. चित्रपट निर्माते दिलीप बोरकर, मराठी चित्रपट परिवाराचे निवृत्ती जाधव, युवक काँग्रेसचे शंकर फडते, समीर कुरतडकर, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कुलकर्णी, प्रियेश सरोदे, सुधीर साकोरे, योगेश निकम, शेखर पवार आदी यावेळी उपस्थित होते. 

दिगंबर कामत म्हणाले, गोव्यामध्ये विविध क्षेत्रातील कलाकार आहेत. त्यांना आपले नशीब आजमावण्यासाठी  मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. अशा कलाकारांना  अधिक चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात  यासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये विविध उपक्रम राबविले गेले. त्याचा गोव्यातील कलाकारांना निश्चितच फायदा झालेला आहे. गोवा लघुपट महोत्सवा सारख्या उपक्रमातून  गोव्यातील चित्रपट निर्माते- दिग्दर्शक आणि कलाकारांना व्यासपीठ मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

लघुपट महोत्सवात भारतासह इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इराण यांसह १५ हून अधिक देशातील १०० लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या सर्व लघुपटांचे स्पर्धा विभागात प्रदर्शन करण्यात येणार आहे. लघुपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. गोव्यासह पुण्यामध्ये देखील अनेक वर्षे हा महोत्सव साजरा केला जात आहे. सर्वोत्कृष्ट लघुपट, दिग्दर्शक, पटकथा लेखन, संकल्पना, कॅमेरामन, संकलन, अ‍ॅनिमेशन, ध्वनी आदी १३ विभागांमध्ये पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. समृद्धी गणपुले यांनी सूत्रसंचालन केले.

Related posts: