|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » कारशेडमध्येच फोडल्या तेजस एक्प्रेच्या काचा

कारशेडमध्येच फोडल्या तेजस एक्प्रेच्या काचा 

खाजगीकरणाविरोधात तोडफोड केल्याचा संशय

मुंबई / प्रतिनिधी

तेजस एक्प्रेसने लखनऊ ते दिल्ली या मार्गावर एका महिन्यात सरासरी 70 लाखांचा नफा मिळवला. त्यामुळे खाजगी तेजस एक्प्रेस चांगलीच चर्चेत आली. मात्र, काही अज्ञातांनी नव्याने सुरू करण्यात आलेल्या गाडय़ांच्या काचांची, आसनव्यवस्थेची तोडफोड काही महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, पुन्हा एकदा मुंबई ते अहमदाबाद या दुसऱया खाजगी तेजस एक्प्रेसच्या काचांची गुजरातच्या रेल्वे कारशेडमध्ये फोडण्यात आली आहे. काही अज्ञातांनी या नव्या तेजस एक्प्रेसच्या काचा फोडल्या आणि सीट तोडून मोठय़ा प्रमाणात नुकसान केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही तेजस एक्प्रेस सुरू होण्यास प्रवाशांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लखनऊ ते दिल्लीदरम्यान देशाची पहिली खाजगी तेजस एक्प्रेस यशस्वी ठरली असतानाच भारतीय रेल्वेने दोन महिन्यांआधी दोन्ही तेजस एक्प्रेस आयआरसीटीसीला सुपूर्द केल्या आहेत. दरम्यान, पहिली तेजस एक्प्रेस 5 ऑक्टोबरला सुरू झाली. तर 9 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबई ते अहमदाबाद दुसरी तेजस एक्प्रेस आयआरसीटीसी सुरू करण्याचे नियोजन होते. यासाठी दुसरी तेजस एक्प्रेस पश्चिम रेल्वेच्या अहमदाबादमधील तातडीने कारशेडमध्ये उभी करण्यात आली होती. मात्र, काही अज्ञातांनी केलेल्या तोडफोडीत नव्या तेजस एक्प्रेसच्या चार ते पाच डब्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, अद्यापही यासंबंधी गुन्हा दाखल केलेला नाही. दरम्यान, या दोन तेजस एक्प्रेस चालवण्याचे अधिकार रेल्वेने आपली उपकंपनी असलेल्या ‘इंडियन रेल्वेज केटरिंग अँड टूरिझम’वर सोपवली आहे. खासगीकरणाच्या दिशेने रेल्वेचे हे पहिले पाऊल मानले जात आहे. अशातच रेल्वे कर्मचारी संघटनांना काही दिवसांपासून रेल्वेच्या खासगीकरणाविरोधात आंदोलन करत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी ‘वंदे भारत एक्प्रेस’ आणि पहिली तेजस एक्प्रेसच्याही काचा फोडण्यात आल्या होत्या. आता तर चक्क कारशेडमध्ये उभ्या असलेल्या दुसऱया तेजस एक्प्रेसची तोडफोड करण्यात आली आहे.

Related posts: