|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » महामार्ग दुरुस्तीबाबत ना. गडकरींचे अधिकार्यांना आदेश

महामार्ग दुरुस्तीबाबत ना. गडकरींचे अधिकार्यांना आदेश 

राष्ट्रीय महामार्गाची खड्डयांमुळे दयनीय अवस्था झाली असून प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. दरवर्षीची ही परिस्थिती असून टोल विरोधी सातारी जनता या सामाजिक समुहाने आधी रस्त्यांची दुरुस्ती मग टोल वसुली या भुमिकेला पाठिंबा देतानाच आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महामार्गाच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दहा दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. यावरच न थांबता आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी रस्ते आणि भूपृष्ठवहन खात्याचे मंत्री ना. नितीन गडकरी यांची शुक्रवारी पुण्यात एका कार्यक्रमात भेट घेवून महामार्ग दुरुस्ती आणि अत्यावश्यक सोयी- सुविधा पुरवण्याबाबतचे निवेदन त्यांना दिले. तसेच यासंदर्भात सविस्तर चर्चा करुन तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. गडकरी यांच्याकडे केली आणि लगेचच ना. गडकरी यांनी दूरध्वनीवरुन संबंधीत अधिकार्यांना कानपिचक्या देत महामार्ग दुरुस्तीचे आदेश दिले. 

सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्गाची दरवर्षी खड्डयांमुळे चाळण झालेली असते. मोठमोठय़ा खडडय़ांमुळे दररोज छोटे- मोठे अपघात घडत आहेत. यामध्ये अनेकांना आपला प्राण गमवावा लागतो तर, अनेक जण कायमचे जायबंदी होत आहेत. लोकांच्या जीवाशी खेळ सुरु असून जीवीत व वित्त हानी होत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण डोळ्यावर पट्टी बांधुन बघ्याची भुमिका घेत आहे. प्राधिकरणाने नेमलेल्या ठेकेदारास तर लोकांच्या जीवाचे काहीही देणेघेणे राहिले नाही. दळणवळणासाठी दर्जेदार महामार्ग असावा, वाहनचालक आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी टोलवसुली आहे, का ठेकेदाराचे इमले उभे करण्यासाठी टोल वसुली आहे, हेच कळेनासे झाले आहे. सातारा- पुणे महामार्गावर सातत्याने खड्डे पडत आहेत. जनतेमधुन संतापाची लाट उभी राहिली की तेवढय़ा पुरती मलमपट्टी होते. कुंभकर्णी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स ठेकेदार यांना वठणीवर आणणे आवश्यक आहे. टोल विरोधी सातारी जनता या सामाजिक समुहाने आधी सुविधा द्या मगच टोल वसुली करा हि भुमिका घेवून जनजागृतीसह आंदोलनाची भुमिका घेतली होती. त्याला आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सक्रिय पाठींबा देत महामार्ग प्राधिकरणाला दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला आणि अकराव्या दिवशी स्वत: टोल बंद आंदलेन छेडण्याचा इशारा दि. 9 नोहेंबर 2019 रोजी दिला होता. दरम्यान, आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. गडकरी यांची भेट घेवून ही समस्या सोडवण्याचे आश्वासनही त्यावेळी टोल विरोधी समुहाला दिले होते. 

            त्यानुसार आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शुक्रवारी दुपारी पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमात ना. गडकरी यांची भेट घेवून महामार्गाच्या दुरावस्थेची आणि त्यामुळे होणार्या जीवीत व वित्तहानीची कल्पना दिली. वाहन चालक आणि प्रवासांच्या समस्यांबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. गडकरी यांच्यासोबत सवीस्तर चर्चा करुन यावर तातडीने तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. गडकरी यांनी लगेचच महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधीत अधिकार्यांना फोन केला. महामार्गाची झालेली दयनीय अवस्था आणि अधिकारी व ठेकेदाराचे दुर्लक्ष याबद्दल तिव्र नाराजी व्यक्त करतानाच ना. गडकरी यांनी अधिकार्यांना कानपिचक्या देत त्वरीत महामार्गाची दुरुस्ती आणि आवश्यक त्या सोयी- सुविधा पुरवण्याचे आदेश दिले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सकारात्मक पाठपुराव्यामुळे महामार्गाच्या दुरुस्तीचा प्रश्न सुटला असून याबद्दल टोल विरोधी जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. 

चौकट… भर कार्यक्रमात आ. शिवेंद्रसिंहराजेंचे केले कौतुक  

दरम्यान, महमार्गाची दुर्दशा आणि त्यामुळे सातार्यात सुरु असलेल्या घडामोडी या वृत्तपत्र आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वदूर पसरल्या आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यासंदर्भात घेतलेली आक्रमक भुमिका याबद्दल ना. नितीन गडकरी यांनी भर कार्यक्रमात उल्लेख करत आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे कौतुक केले. भाषण करताना ना. गडकरी यांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा उल्लख करत त्यांनी महामार्गावरील खड्डे आणि सोयी- सुविधांची समस्या मांडली. ही समस्या महामार्गावर बहुतांश सर्वच ठिकाणी आहे. याबाबत आपण संबंधीत अधिकार्यांना योग्य ते आदेश दिले असल्याचे सांगून ना. गडकरी यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या भूमिकेचे स्वागत केले.   

 

 

Related posts: