|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अनुकंपा भरती, शिक्षण,आरोग्य विभागावर सदस्यांनी साधला निशाणा

अनुकंपा भरती, शिक्षण,आरोग्य विभागावर सदस्यांनी साधला निशाणा 

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण विभागात आरटीई नियमानुसार शाळांचे 4 कोटी रुपयांचा निधी येवून दहा महिने फाईल पडून आहे, विशेष शिक्षकांच्या बदल्या अचानकपणे केल्या जातात, अशा आरोपांनी सदस्यांनी शिक्षण विभागावर निशाणा साधला. ग्रामसेवक वर्ष वर्ष गावाकडे फिरकत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी लक्तरे सदस्यांनी मांडली. 2010 पासून जिल्हा परिषदेने अनुकंपा तत्वावरील 79 कर्मचाऱयांच्या नियुक्त्या केल्या नाहीत. या मुद्यावरुन बापूसाहेब जाधव, अर्चना देशमुख यांनी लावून धरला. त्यामध्ये रमेश पाटील यांनी इतर जिल्हा परिषदांमध्ये भरती होते आणि सातारा जिल्हा परिषदेत का नाही असा मुद्दा मांडला. माणचे सभापती पाटोळे यांचा बालिशपणा पुन्हा एकदा सभागृहासमोर आल्याने त्यांना अध्यक्ष संजीवराजेंनी छानपैकी कानटोचणी दिली.

सभेच्या सुरुवातीला भीमराव पाटील यांनी प्रोसिडींग आता मिळाले, तेव्हा दोन समितीच्या सदस्य निवडीचा कार्यक्रम माहिती पडला. ही प्रक्रिया चुकीची आहे. प्रोसिडींग अगोदर बघायला मिळाले पाहिजे. अभ्यास करता येत नाही. निवडीच्या कार्यक्रमाकरता काहीतरी कालावधी द्या. नवीन सदस्य त्या जागेवर येईल त्यालाच घ्या, असे सुचित केले. त्यावर अरुण गोरे म्हणाले, समितीच्या सदस्य निवडीचे एकाही सदस्याला माहिती नाही. भीमराव पाटील म्हणाले, ही काय पद्धत आहे काय?, अशी मुद्दा मांडताच सुरेंद्र गुदगे यांनी ही गोष्ट खरी आहे. प्रशासनाने माहिती पोहचवली असेल त्यांची डय़ुटी केली असेल. यशंवतरावांचा जिल्हा आहे. जिह्याच्या लौकिकाला वागूयात. रिक्त जागा भरायची निवड आता रद्द करता येणार नाही, असे सांगताच सागर शिवदास म्हणाले, आमचे अडीच वर्ष अशीच ऐकण्यात गेली. फिरवून फिरवून तिथेच आणता. सुरेंद्र गुदगे म्हणाले, दीपक पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त जागेची निवड आहे. त्यावर भीमराव पाटील म्हणाले, नवीन सदस्य आल्यानंतर निवड होईल. मात्र, अध्यक्षसाहेब तुमच्या अडीच वर्षाच्या काळात असे झाले नाही शेवटाला तरीही असे होवू नये, असा टीप्पणी करताच संजीवराजेंनी तो विषय रद्द करण्यात आल्याचे सांगितले.

जलस्वराज्यावरुन पाणी पुरवठा अभियंता निशाण्यावर

जयवंतराव भोसले यांनी जलस्वराज्य योजनेचे काम पूर्ण झाले नाही. पैसे मात्र भरुन घेतले आहेत. दोन वर्ष भांडतो आहे, कोणीही दखल घेत नाही. धरण उशाला आणि कोरड घशाला असा प्रकार होत आहे, असा आरोप करता पाणी पुरवठय़ाचे अभियंत्यांनी 200 प्रकल्प पूर्ण केले आहेत. 10 कोटी जमा केले आहेत, असे सांगताच प्रदीप विधाते यांनी आपली जबाबदी योजना पूर्ण करण्याची येते, त्यावर संजीवराजेंनी तशा सुचना दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत यांनीही 80 टक्के कामे पूर्ण झाल्याचे सांगितले.

अनुकंपा तत्वाचा प्रश्न मार्गी लागणार

 ‘तरुण भारत’ने अंदाज वर्तवल्यानुसार बापूसाहेब जाधव यांनी अनुकंपा भरतीचा मुद्दा उचलून धरला. अनुकंपा तत्वावरील 79 जणांना नोकरी मिळणार कधी?, आज त्यांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. 2010 पासून भरती केली नाही, असा मुद्दा मांडला. अर्चना देशमुख म्हणाल्या, 2010 पासून नियुक्त्या झाल्या नाहीत. बापूसाहेब यांनी पुन्हा प्रश्न केला की किती दिवसात होणार?, रमेश पाटील म्हणाले, दि. 21 ऑगस्ट 2019 च्या सभेत मानसिंगराव जगदाळे यांनी मुद्दा मांडला होता. अजूनही एक पद भरले गेले नाही. नगरमध्ये 35, कोल्हापूरात 37, हिंगोलीत 18, नांदेडमध्ये 45, बीडमध्ये 21, रत्नागिरीत 42 पदे भरली आहेत, असे सांगितले. उदयसिंह उंडाळकर यांनी पाटणच्या बैठकीत ठरले होते. तेव्हा आश्वासनही दिले होते. आज काही होत नाही. सागर शिवदास म्हणाले किती दिवसात होणार हे सांगा, तुमच्या हातून होवू द्या, वेळ मारुन नेवू नका, असे सांगताच वसंतराव मानकुमरे म्हणाले, शेवटचे आणि कायमचे उत्तर असणार असे सांगितले. त्यावर संजीवराजे यांनी शेवटच्या टप्यात काम आल्याचे सांगितले.

ग्रामसेवकांची लक्तरे मांडली

अरुण गोरे यांनी ग्रामसेवक गावातच येत नाही. धैर्यशील अनपट यांनी दोन ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. गुदगे यांनी ग्रामसेवकांवर कारवाई होत नाही. जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण पत्र देतो, परंतु खटावचे बीडीओ गोडगोड बोलतात काही करत नाहीत. तर श्रीनिवास थोरात यांनीही कोपर्डे हवेलीच्या ग्रामसेवकावर कारवाई करा किंवा सरपंचावर कारवाई करा, अशी मागणी केली.

शिक्षण विभाग निशाण्यावर

माण तालुक्यात 7 विशेष शिक्षक असताना दिव्यांग 1250 पट आहे. दोन शिक्षकांची पाटणला कशी बदली केली कोणत्या नियमाने?, त्यावर उपशिक्षणाधिकारी जाधव यांनी समुपदेशाने बदली केली असे सांगताच पुन्हा गोरे म्हणाले, माणचाच का उचलले. पाटणला किती विद्यार्थी आहेत ते सांगा?, अशी विचारणा केली. भीमराव पाटील म्हणाले, शिक्षण सभापतींच्या निदर्शनास आले आहे काय? असा प्रश्न छेडताच सभापती राजेश पवार म्हणाले, ही माहिती माझ्यापर्यंत आली नाही, असे सांगितले. मंगेश धुमाळ यांनी आरटीई नुसार सलवत दिली जाते. इंग्रजी शाळांचा 4 कोटी निधी आला आहे. 11 महिन्यांपासून शिक्षणाधिकाऱयांच्या टेबलवर फाईल फडून आहे. उपशिक्षणाधिकारी जाधव यांनी त्यांच्या प्रस्तावात त्रुटी होत्या म्हणून थांबल्याचे सांगितले. गुदगे यांनी शिक्षण विभागाच्या चुकीच्या बाबी असल्याचे सांगत आरोग्य विभागावरही निशाणा साधला.

माणच्या सभापतींना कानटोचणी

माणचे सभापती पाटोळे यांना बोलण्याची संधी दिल्यानंतर ते काहीही प्रश्न विचारु लागले. त्यावर संजीवराजेंनी कानटोचणी घेत तुम्हाला अधिकार आहेत ते वापरा, असा सल्ला दिला. परंतु सभापतींच्या प्रश्नावर सभागृहात हस्या पिकला.

Related posts: