|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जिह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा

जिह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिह्यात पावसाने शेतकऱयांचे हाल केले आहेत. शेती वाहून गेली आहे. जमिनीची धूप मोठय़ा प्रमाणावर झाली आहे. घरांची पडझड झाली आहे. शेतकऱयांच्या शेतावर जावून पंचनामे करण्याचा निकष होता तो चुकीचा आहे. सरसकट शेतकऱयांचे पंचनामे व्हावेत. पंचनाम्यांना मुदतवाढ मिळावी. शेतकऱयांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत मिळावी, अशा जिल्हा परिषद सदस्यांनी सभागृहात मागण्यांचा भडीमार केला. जिह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. दरम्यान, जिरायती आणि बागायती यामध्ये मिळणारी मदत तुटपुंजी असून सरकार शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसते आहे, असा आरोप सुरेंद्र गुदगे यांनी केला.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला राजेश पवार यांनी दुखवटय़ाचे आणि अभिनंदनाचे ठराव मांडले. सभेच्या शेवटी ओल्या दुष्काळावर चर्चा झाली.

मानसिंगराव जगदाळे यांनी ओल्या दुष्काळावर चर्चा करण्यास विनंती केली. त्यानुसार प्रदीप पाटील म्हणाले, जी घरे पडली आहेत त्यांना निधी मिळणार का?, पंचनामे करुन घेतले आहे. शासन अनुदान देईल का?, तोपर्यत त्यांनी कुठे राहयचे असा सवाल उपस्थित केला. बापूसाहेब जाधव म्हणाले, पावसाने निवकणे गावात 9 घरे पडली आहेत. त्या घरांची पाहणी केली. 7 घरांना मंजूरी मिळाली पण ज्यांना 2 घरांचे नावही आले नाही, हे असे का?, असा सवाल उपस्थित केला. महसूलच्या अधिकाऱयांनी माहिती दिली. फडतरे यांनी 6500 घरांचा अहवाल पाठवला आहे. 700 घरांचा सर्व्हे झाला आहे. आता 65 मिलीमीटर पाऊस जेथे झाला तेथील सर्व्हे सुरु आहे.

प्रदीप विधाते म्हणाले, खटावमध्ये आलं पिक काही शेतकऱयांचे आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यालाही भरपाई मिळावी. अरुण गोरे म्हणाले, दुष्काळावर आम्ही नेहमी बोलत असतो. परंतु आज पहिल्यांदा ओल्या दुष्काळावर बोलतो आहे. अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेचे रस्ते, पुल वाहून गेले आहेत. त्यास निधी मिळावा, अशी मागणी केली. कोरेगावचे सभापती राजाभाऊ जगदाळे म्हणाले, 65 मिलीमीटरचा निकष बंद करण्यात यावा, अशी मागणी केली.

भीमराव पाटील म्हणाले, त्या निकषामुळे अनेक शेतकऱयांचे नुकसान होवूनही त्यांना निधी मिळणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱयांचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी केली. सुरेंद्र गुदगे म्हणाले, आतापर्यंत दुष्काळावर बोलत होतो. प्रथमच ओल्या दुष्काळावर बोलतो आहे. आमच्याकडे पंचनामे करताना ग्रामसेवक, तलाठी आणि कृषीसेवक यांना एकत्रित पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु पंचनाम्यास उशीर लागत असल्याने पुन्हा एकेका अधिकाऱयांकडे ठराविक गावे दिली आहेत. त्या अधिकाऱयांनाही पंचनामे होत नाहीत. खटाव-माण तालुक्यातील बांगाचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षांच्या, पेरुच्या, डाळींबाच्या बागांना उन्हाळय़ात टँकरने पाणी घातले आहे. बागा जगवण्यासाठी लाख लाख रुपये खर्च केले आहेत. कृषी अधिकाऱयांनी ही बाब लक्षात घ्यावी. पिक विम्याचा फायदा होतो. परंतु तो चार महिन्यापुरताच मर्यादित असतो. वर्षभर पिक विमा देण्यात यावा, हेक्टरी 25 हजार रुपये मदत देण्यात यावे, अशी मागणी केली. त्यावर अध्यक्ष संजीवराजे यांनी मदतीचे निकष काय आहेत किती मदत मिळणार आहे याची विचारणा केली. त्यावर कृषी अधिकाऱयांनी बागायतीला 18 हजार 500 तर जिरायतीला 6 हजार 500 मिळणार आहे, असे उत्तर देताच गुदगे यांनी सरकार शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करते आहे, असा आरोप केला.

मानसिंगराव जगदाळे म्हणाले, ओला दुष्काळ जिह्यात जाहीर करण्यात यावा, शेतकऱयांचे कर्जे माफ करण्यात यावीत, हेक्टरी 25 हजार रुपये मदत मिळावी असा ठराव घेण्याची विनंती केली. तर उदयसिंह उंडाळकर यांनी जमिनीची धुप झाली आहे त्याचेही पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी केली. शेवटी संजीवराजेंनी आताच्या निकषात बदल करण्यात यावा, कर्ज माफी करण्यात यावी, शेतकऱयांच्या हातात काहीच राहिले नाही. लवकरच मदत मिळावी, रस्ते, साकव यांना निधी मिळावा, एका दिवसाचा 65 मिलीमीटरचा निकष लावू नये, ओला दुष्काळ जाहीर करावा, असा ठराव मंजूर करण्यात यावा, असे सूचित केले. 

 

 

Related posts: