|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » माहिती न देणाऱया दूध संघांवर कारवाई

माहिती न देणाऱया दूध संघांवर कारवाई 

उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांचा इशारा

  पुणे / प्रतिनिधी :

ज्या सहकारी दूध संघांच्या निवडणुका आगामी वर्षात होणार असून, त्यांनी 180 दिवस अगोदर प्राथमिक मतदारयादी व अनुषंगिक माहिती निबंधकांना कळवायला हवी. त्यामध्ये माहिती देण्यास हलगर्जीपणा झाल्यास संबंधित सहकारी दूध संघाचे कार्यकारी संचालक आणि व्यवस्थापकांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी येथे दिला.

कात्रज दूध संघात पुणे विभागातील सहकारी दूध संघाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी सहकारचे अधिकारी, सहकारी दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सहकारी दूध संघांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत निबंधकांकडे लेखी स्वरुपात पाठविण्याचे कायद्याने बंधनकारक असतानाही त्याचे पालन होत नाही. त्यामुळे तत्काळ वृत्तांत पाठविताना लेखापरिक्षण अहवालातील दोष दुरुस्ती अहवाल तातडीने दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी केल्या.

आगामी वर्षात सहकारी संघांच्या निवडणुकांमध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, राजारामबापू सहकारी दूध संघ सांगली, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, शिवामृत सहकारी दूध उत्पादक संघ, अकलूज यांच्यासह सातारा, फलटण, खंडाळा, पाटण, वसंतदादा आणि विटा सहकारी दूध संघांचा समावेश आहे. त्यांच्या विद्यमान संचालक मंडळाच्या पंचवार्षिक मुदत संपण्यापूर्वी वेळेत मतदारयाद्या देण्याची जबाबदारी कार्यकारी संचालकांची आहे.

सहकारी संघाच्या उपस्थित प्रतिनिधींनी राज्य सरकारकडून गायीच्या दुधाच्या अनुदान योजनेतील रक्कम अजूनही मिळालेली नाही. तसेच चारा छावण्यांना काही दूध संघांकडून पशुखाद्याचा पुरवठा करण्यात आलेला आहे. त्या रकमासुद्धा सरकारकडून मिळाल्या नसल्याची माहिती बैठकीत दिली असता संबंधित महसूल विभागास ही माहिती कळविण्याचे आश्वासन त्यांनी बैठकीत दिले.

Related posts: