|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Agriculture » शेतकरी नेत्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी : आ. मुश्रीफ

शेतकरी नेत्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी : आ. मुश्रीफ 

प्रतिनिधी / कोल्हापूर

शेतकऱयांवर कोसळलेल्या अभूतपूर्व संकटातयंदाच्या गळीत हंगाम निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कारखानदारांनी पुढाकार घेतला आहे. रविवार 17 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी कारखानदारांचे प्रतिनिधी प्राथमिक चर्चा करणार आहेत. शनिवारी जिल्हा बँकेत झालेल्या साखर कारखानदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आमदार हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आवाडे, आमदार सतेज पाटील व खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यासह कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात दुपारी चार वाजता झालेल्या या बैठकीत प्रामुख्याने यंदाचा गळीत हंगामात साखर कारखानदारांसमोरील आव्हानांवरच अधिक चर्चा झाली. बैठकी नंतर पत्रकारांशी बोलतान आमदार मुश्रीफ म्हणाले, अतिवृष्टी, महापूर व अवकाळीमुळे यंदा ऊसाचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे कारखान्यांचे गाळप उद्दीष्टही पुर्ण होणार नाही. कमी कालावधी मिळणार आहे. त्यातच कर्नाटक राज्याने झोनबंदी केल्याने कर्नाटकातील ऊस महाराष्ट्रात येणार नाही. याच्या उलट महाराष्ट्रात झोन बंदी नसल्याने सीमा भागातील कारखान्यांने सुरू झाल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आपला ऊस तिकडे पाठवत आहेत. त्यामुळे राज्यातील कारखान्यांना आणखी उस कमी पडणार आहे. हे टाळण्यासाठी यंदाचा हंगाम वेळेत सुरू करणे आवश्यक होते. मात्र महापूर व अवकाळीमुळे अजूनही ऊस शेतीमध्ये पाणी आहे, ऊस वाहतुकीला अडचणी येणार आहेत. त्यातच सरकार स्थापन न झाल्याने मंत्री समितीची बैठकही झालेली नाही. कारखाने सुरू करण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे तोडणी देणेही अवघड आहे. 15 नोव्हेंबर नंतर आपल्या सोयीने कारखाने सुरू करण्याचे ठरले होते. एक दोन कारखाने सुरू झाले आहेत.

मात्र स्वाभिमानीची ऊस परिषद 23 नोव्हेंबर रोजी आहे. खरेतर गेल्या दोन वर्षापासून त्यांना 1 नोव्हेंबर पुर्वी ऊस परिषद घेण्याची विनंती केली होती. यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे हंगाम लांबला आहे. त्यातच ऊस परिषद होई पर्यंत किंवा दर जाहिर करुन कारखाने सुरू करा. अशी विनंतर स्वाभिमानीच्या नेत्यांनी केली आहे. त्यानुसार आज कारखानदारांच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली. त्यानुसार कारखान्यांसमारील अडचणी सांगून दराचा योग्य तोडगा काढून कारखाने वेळेत सुरू करण्यासाठी सर्वच शेतकरी संघटनांनी सहकार्य करावे. अशी विनंती करण्यात येणार आहे. आजच्या बैठकीला माजी आमदार के.पी. पाटील, उदयसिंह पाटील-कौलवकर, उत्तम वरुटे, यांच्यासह कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित हेते.

या मुद्यांवर झाली चर्चा

-अतिवृष्टी, महापूर व अवकाळीमुळे ऊस उत्पादन घटणार

-कमी उसामुळे हंगामाचा कालावधी कमी होणार

-उसाची पळवापळवी होणार

-नवीन पिकासाठी पुरबाधित ऊस काढावा लागणार

-झोनबंदी नसल्याने राज्यातील ऊस बाहेर जाणार

-झोनबंदीमुळे कर्नाटकातील ऊस येणार नाही.

-कारखान्यांवर कर्जाचा बोजा असल्याने नवीन कर्जाची अडचण

-एफआरपी पेक्षा जादा दर अशक्य

खासदार मंडलिक, आमदार प्रकाश आवाडेंच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ

स्वाभिमानी शेतकीर संघटनेच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी साखर कारखानदारांच्या वतीने आठ जणांचे शिष्टमंडळ नेमण्यात आले आहे. यामध्ये खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील, राजारामचे एमडी पी. जी. मेढे, जवाहरचे एम. डी. मनोहर जोशी, गुरूदत्तचे एम. डी. एम. व्ही. पाटील यांचा समावेश आहे.

 

Related posts: