शिवसेना ‘एनडीए’ मधून बाहेर; भाजपकडून अधिकृत घोषणा

ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना ‘एनडीए’मधून बाहेर पडली आहे, अशी अधिकृत घोषणा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली आहे.
राज्यातील सत्तास्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. त्यामुळे शिवसेना युतीतून बाहेर पडली आहे. शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलाविण्यात आलेल्या एनडीएच्या बैठकीला निवसेनेला निमंत्रण नव्हते.
शिवसेना युतीतून बाहेर पडल्यामुळे आता शिवसेनेचे खासदार लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी बाकावर बसणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर युती तुटल्याने आता राज्यसभेमध्ये शिवसेनेवर कोणतेही बंधन राहणार नाही. शिवसेनेला आपल्या भूमिका स्पष्टपणे मांडता येणार आहेत.
तर संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (18 नोव्हेंबर) सुरू होत आहे. तत्पूर्वी घटकपक्षांची एक बैठक होते. ही बैठक अनौपचारिक असली तरी देखील त्याला राजकीय महत्त्व असते. मात्र, भाजपकडून शिवसेनेला निमंत्रण देण्यात आले नव्हते. शिवसेनेकडून युती संपुष्टात आल्याची घोषणा करण्यात आली नव्हती. आज मात्र, भाजपकडून ही अधिकृत घोषणा करण्यात आली.