|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » राजकीय, सामाजिक, धार्मिक ध्रुवीकरण मांडणारा लेखक

राजकीय, सामाजिक, धार्मिक ध्रुवीकरण मांडणारा लेखक 

प्रवीण बांदेकर यांना गाडगीळ पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी / सावंतवाडी:

गंगाधर गाडगीळ यांनी आधुनिकतेचा कायम आपल्या लेखनात विचार केला. प्रवीण बांदेकर यांच्या कादंबरी लेखनातही आधुनिकतेचाच विचार आहे. तसेच राजकीय, सामाजिक, धार्मिक ध्रुवीकरण मांडले असून नवयुगाचं राजकारण, सनातनी अस्मितांचं धर्मकारण लिहिताना ते जो धोका पत्करतात त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, असे प्रतिपादन समीक्षक, शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी येथे केले.

शहरातील आरपीडी विद्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ कादंबरीकर श्याम मनोहर  यांच्या हस्ते गंगाधर गाडगीळ पुरस्कार प्रा. बांदेकर यांना रोख 25 हजार, मानपत्र स्वरुपात प्रदान करण्यात आला. सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला पॉप्युलर प्रकाशनाच्या संपादिका अस्मिता मोहिते, प्राचार्य बी. एस. पाटील, तुकाराम नाईक, डॉ. प्रा. गोविंद काजरेकर, प्रा. सुमेधा धुरी आदी उपस्थित होते. सभागृहात ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस, समीक्षक वासुदेव सावंत, छायाचित्रकार संदेश भंडारे, प्रा. नंदकुमार मोरे उपस्थित होते.

                बदलत्या काळाची घुसमट मांडणारा लेखक!

डॉ. शिंदे म्हणाले, एकविसाव्या शतकाच्या प्रारंभामध्ये आधुनिकतेचा अतिशय महत्वाचा उद्गार प्रा. बांदेकर यांच्या लेखनात आहे. गाडगीळ यांनी आधुनिकतेचा कायम आपल्या लेखनात विचार केला. बांदेकर गेल्या 25 वर्षाचा पट नेमकेपणाने मांडताहेत. आजच्या बदलत्या काळाची घुसमट मांडणारा हा महत्वाचा लेखक आहे. नवयुगाचं राजकारण, सनातनी अस्मितांचं धर्मकारण लिहिताना ते जो धोका पत्करतात त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं. म्हणून त्यांचं कादंबरीकार म्हणून खूप वेगळेपण आहे. इतिहासाची नकारात्मक सूत्र न येता त्यांच्या कादंबरीत आजच्या वर्तमानात ते इतिहास शोधतात. ते कोकणचं चित्र रोमँटिक पद्धतीने करत नाहीत. ते कोकणच्या सामाजिक बदलाला थेट सामोरे जातात. समकालीन परंपरेतील त्यांचे राजकीय आकलन मोठे आहे. राजकीय, सामाजिक, धार्मिक ध्रुवीकरण ते मांडतात.

                       वाचन संस्कृती क्षीण होतेय…

लेखक श्याम मनोहर म्हणाले, पुरस्कारावर लेखकाचा हक्क नसतो, तो आनंद व्यक्त करू शकतो. लेखकाला मानधन चांगलं मिळायला हवे. त्यावरच तो पूर्णवेळ लिहू शकतो. लेखकाला चिंतन करायला वेळ लागतो. लेखकानं काय करायचं आणि काय नाही करायचं, हे ठरवायला हवं. पुस्तकं खपली तर मानधन मिळणार आहे. वाचन संस्कृती क्षीण आहे. कादंबरी सामान्य वाचकांपर्यंत पोहोचत नाहीय, याचा विचार करायला हवा. साहित्याचा हेतू काय हेदेखील आपल्याला माहीत असायला हवा. कला-साहित्याच्या प्रसारातूनच संस्कृती तयार होते. पुरस्कार समितीच्या चर्चेची माहिती नोंद करून ठेवावी. म्हणजे या साहित्यकृतीची निवड का केली हे कळेल.

विकास सावंत म्हणाले, आरपीडी संस्थेला कायम केशवसुतांची आठवण येत राहते. बांदेकर यांनी सांगितल्याप्रमाणे केशवसुत, कवी वसंत सावंत यांची आठवण कायमस्वरुपी ठेवली जाईल, असे काम उभारू. बांदेकर आमच्या विद्यालयाचे शिक्षक आहेत, याचा आनंद आहे. आताच्या पिढीने साहित्य वाचलं पाहिजे. साहित्याचा आस्वाद घेता आला पाहिजे.

                     पुरस्काराची रक्कम आरपीडीला

प्रा. बांदेकर म्हणाले, मी या कार्यक्रमामुळे भारावून गेलो. पुरस्कार कुणाकडून दिला जातो आणि कुणाच्या नावाने तो दिला जातो, हे महत्वाचं असतं. माझ्या आधी पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीही आहेत. मी या पुरस्काराची रक्कम आरपीडी संस्थेला देत आहे.

अस्मिता मोहिते म्हणाल्या, सावंतवाडीत आल्यावर कविवर्य वसंत सावंत यांची आठवण होतेच. गाडगीळ पुरस्कार तीन वर्षांनी एका प्रयोगशील लेखकाला दिला जातो. या पुरस्काराची निवड दिग्गज समीक्षकांनी केली आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मानपत्राचे वाचन प्रा. सुमेधा धुरी यांनी तर प्रास्ताविक गोविंद काजरेकर यांनी केले. आभार प्रा. सकपाळ यांनी मानले.

Related posts: