|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » जलद आर्थिक विकासाची भारताकडे क्षमता!

जलद आर्थिक विकासाची भारताकडे क्षमता! 

बिल गेट्स यांचे प्रतिपादन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील सर्वात धनाढय़ व्यक्ती बिल गेट्स यांनी भारतामध्ये आर्थिक विकासाबद्दल पूरेपूर क्षमता असल्याचे उद्गार काढले आहेत. आगामी दशकात भारताचा आर्थिक विकास अत्यंत वेगवान राहणार असल्याने देशातील लोकांना दारिद्रय़ातून बाहेर काढण्यास मदत मिळणार आहे. तसेच आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात सरकारला मोठी गुंतवणूक करणे शक्य होणार असल्याचे गेट्स यांनी नमूद केले आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत गेट्स यांनी भारतातील ‘आधार’ प्रणाली तसेच वित्तीय सेवा आणि औषधनिर्मिती क्षेत्राचे कौतुक केले आहे.

आशियातील तिसऱया क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत मंदगतीचा विकास दिसून येत असताना जगातील सर्वात धनाढय़ व्यक्तीने भारतासंबंधी सकारात्मक उद्गार काढले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेतील मंद अर्थगतीचा हा काळ यापुढेही कायम राहू शकतो अशी भीती अनेक अहवालांमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

भारतात वेगवान विकास शक्य

नजीकच्या भविष्याबद्दल मला फारसे माहित नाही, पण पुढील दशकात वेगवान विकासाची मोठी शक्यता आहे. भारतात खरोखरच जलद विकासाची क्षमता असल्याने भविष्यात उत्तम संधी मिळणार असल्याची प्रत्येकाला आशा असल्याचे गेट्स म्हणाले. जून महिन्यात संपुष्टात आलेल्या तिमाहीत आर्थिक विकासाचा दर 6 वर्षांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला होता. कमकुवत होत चाललेली मागणी तसेच खासगी गुंतवणूक रोडावल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

आधार, युपीआयचे कौतुक

भारत नेहमीच नवोन्मेषी आणि वित्तीय सेवांसाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरला आहे. भारतात आधार आणि युपीआय प्रणालीने उत्तम काम केले आहे. देशाच्या लस उत्पादन क्षेत्रातही कौतुकास्पद कार्य होत असल्याने लाखो लोकांच्या जीवनात सुधारणा झाल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत.

जगाचे सर्वात धनाढय़

64 वर्षीय गेट्स हे 110 अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेसह पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक धनाढय़ व्यक्ती ठरले आहेत. बिल गेट्स यांनी अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना मागे टाकले आहे. गेट्स यांनी आतापर्यंत बिल अँड मेलिंडा गेट्स फौंडेशनला 35 अब्ज डॉलर्सची देणगी दिली आहे. हे फौंडेशन जगभरातील गरीबी दूर करणे आणि सामाजिक विकास कार्यक्रमांसाठी कार्यरत आहे. बिल गेट्स सध्या भारताच्या दौऱयावर असून फौंडेशनच्या कामांचा आढावा घेत आहेत.

Related posts: