|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Agriculture » ऊस गळीत हंगामावर आंदोलनाचे सावट

ऊस गळीत हंगामावर आंदोलनाचे सावट 

प्रतिनिधी / सांगली

ऊस दर जाहीर न करता साखर कारखानदारांनी गळीत हंगाम सुरु करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. सांगली-कोल्हापूर जिह्यातील काही कारखाने आजपासून सुरु होणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र दर जाहीर झाल्याशिवाय ऊस तोडी होऊ देणार नाही या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे गळीत हंगामावर आंदोलनाचे सावट निर्माण झाले आहे. स्वाभिमानीने प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद येत्या 23 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे होणार आहे. यामध्ये माजी खा. राजू शेट्टी किती दर मागतात यावर हंगामाचे भवितव्य अवलंबून आहे. महापूर आणि अतिवृष्टीमुळे यंदा ऊसाच्या क्षेत्रात कमालीची घट आली आहे. दुष्काळी तालुक्यातील ऊस चार छावण्यांसाठी गेला आहे. त्यामुळे यंदा साखर कारखान्यांना उसाची कमतरता भासणार आहे. दरम्यान उसाची कमतरता लक्षात घेत सांगलीसह कोल्हापूर जिह्यातील साखर कारखानदारांनी कारखाने सुरु करण्याची पूर्ण तयारी केली आहे. लवकर कारखाना सुरु करुन जास्तीत जास्त गाळप करण्याचा कारखानदारांचा मानस आहे.

आजपासून काही कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु होणार आहे. तर उर्वरित कारखाने 25 नोव्हेंबर पासून गाळप सुरु करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान दर जाहीर न करताच गाळप सुरु होणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ‘आधी दर मगच ऊस तोड’ अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे. कोल्हापूर जिह्यात याची झलकही त्यांनी दाखवली आहे. काही कारखान्यांची वाहने अडवून स्वाभिमानीने अप्रत्यक्षरित्या आंदोलनाचाच इशारा दिला आहे.

दरम्यान, ऊस दराबाबत रविवारी कोल्हापूरमध्ये साखर कारखानदार व स्वाभिमानीच्या पदाधिकाऱयांच्यामध्ये बैठक झाली. यामध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. कारखानदारांनी असहकार्य केल्याने स्वाभिमानीच्या पदाधिकाऱयांनी बैठक अर्ध्यावर सोडली. दर जाहीर झाल्याशिवाय हंगाम सुरु होऊ देणार नाही असा इशारा दिला. त्यामुळे गळीत हंगामावर आंदोलनाचे सावट निर्माण झाले आहे. स्वाभिमानीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ऊस उत्पादकांच्या बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. दर जाहीर होईपर्यंत ऊस तोडी न स्वीकारण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे ऊस पट्टयात वातावरण तापले आहे.

शेट्टी अन् कारखानदारांचे सूत

स्वाभिमानीचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याबरोबर चांगलेच सूत जमले आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे व सातारा या पश्चिम महाराष्ट्राती प्रमुख जिह्यातील साखर कारखानदार काँग्रेस-राष्ट्रवादीचेच आहेत. शेट्टींच्या मैत्रीसाठी ते यावेळी ऊस उत्पादकांना चांगला भाव देणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. असे न झाल्यास शेट्टींना साखर कारखानदारांच्या विरोधात शड्डू ठोकावा लागणार आहे.

Related posts: