|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » मुस्लीम संघटना पुनर्विचार याचिका सादर करणार

मुस्लीम संघटना पुनर्विचार याचिका सादर करणार 

रामजन्मभूमी निर्णय अमान्य असल्याचे केले स्पष्ट, फूट पडल्याचीही चिन्हे

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

9 नोव्हेंबर 2019 या दिवशी माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या नेतृत्वातील सर्वोच्च न्यायालयाच्या पंचसदस्यीय पीठाने अयोध्येतील वादग्रस्त भूमी ‘रामलल्ला विराजमान’ यांच्या स्वामित्वाचीच आहे, हा दिलेला एकमुखी निर्णय काही मुस्लीम संघटनांनी नाकारला आहे. या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका सादर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तीगत कायदा मंडळ आणि जमियत उलेमा ई हिंद या संघटनांनी पुनर्विचार याचिका सादर करण्याची तयारी केली आहे. न्यायालयाने मुस्लीमांना देऊ पेलेली पाच एकर जागाही त्यांनी नाकारली आहे. त्यामुळे रामजन्मभूमी प्रकरण पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

आमची पुनर्विचार याचिका फेटाळली जाईल, याची आम्हाला खात्री आहे. तरीही ती सादर करणे आमचा अधिकार आहे. आम्ही आमच्या अधिकारासाठी लढत आहोत, अशी विधाने जमियतचे नेते मौलाना अर्शन मदनी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

पुनर्विचार याचिका कोण सादर करणार

पुनर्विचार याचिका केवळ या प्रकरणातील पक्षकार सादर करू शकतात असे मत अनेक कायदेतज्ञांनी व्यक्त केले आहे. मुस्लीम व्यक्तीगत कायदा मंडळ आणि जमियत या दोन्ही संघटना या प्रकरणातील पक्षकार नाहीत. त्यामुळे पुनर्विचार याचिका कोण सादर करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

लखनौ बैठकीत निर्णय

मुस्लीम व्यक्तीगत कायदा मंडळाची बैठक लखनौमध्ये रविवारी घेण्यात आली. या बैठकीत पुनर्विचार याचिकेच्या बाजूने कल दिसून आला. मात्र या प्रकरणातील मुख्य मुस्लीम पक्षकार अन्सारी यांनी अशी याचिका सादर करण्यास विरोध केल्याचेही समजते. त्यामुळे मुस्लीम व्यक्ती आणि संघटनांमध्ये या प्रश्नावरून फूट पडल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पुराव्यांच्या आधारावर नाही अशी टीका मुस्लीम संघटनांकडून करण्यात येत आहे.

Related posts: