|Saturday, December 7, 2019
You are here: Home » क्रिडा » पृथ्वी शॉचे धमाकेदार पुनरागमन, मुंबईचा सहज विजय

पृथ्वी शॉचे धमाकेदार पुनरागमन, मुंबईचा सहज विजय 

आसामवर 83 धावांनी मात, पृथ्वीच्या 39 चेंडूत 63 धावा, आदित्य तरेचीही झंझावती खेळी

वृत्तसंस्था/ मुंबई

उत्तेजक द्रव्य सेवन केल्याने सहा महिन्याची बंदी संपल्यानंतर सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने (39 चेंडूत 63) धडाक्यात पुनरागमन करत मुंबईच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली. पृथ्वी शॉ व आदित्य तरे यांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत आसामवर 83 धावांनी विजय मिळवला. प्रारंभी, मुंबईने 5 बाद 206 धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना आसामला 8 बाद 123 धावापर्यंत मजल मारता आली. या विजयासह मुंबईने चार गुणाची कमाई करत ड गटात 24 गुणासह आपले अव्वलस्थान आणखी भक्कम केले आहे.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात दमदार झाली. बंदीची शिक्षा संपल्यानंतर पुनरागमन करणाऱया युवा फलंदाज पृथ्वी शॉ व आदित्य तरे यांनी 138 धावांची सलामी दिली. या जोडीने आसामच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना चौफेर फटकेबाजी केली. तरेने 48 चेंडूत 12 चौकार व 1 षटकारासह 82 धावा कुटल्या. पृथ्वीनेही आक्रमक फलंदाजी करताना अवघ्या 39 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारासह 63 धावांची खेळी साकारली. ही जोडी बाद झाल्यानंतर कर्णधार सुर्यकुमार यादव (0) व श्रेयस अय्यर (16) या स्टार फलंदाजांनी निराशा केली. यानंतर, सिद्धेश लाडने 14 चेंडूत नाबाद 32 धावांची खेळी साकारल्यामुळे मुंबईला 20 षटकांत 5 बाद 206 धावापर्यंत मजल मारता आली. आसामकडून रियान परागने 3 तर अबु निचमने 2 गडी बाद केले.

मुंबईने विजयासाठी दिलेल्या 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आसामला 8 बाद 123 धावा करता आल्या. आसामकडून रियान परागने सर्वाधिक 38 धावा फटकावल्या. शिवशंकर रॉय (22) व अमित सिन्हा (22) धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी मात्र निराशा केल्यामुळे आसामला 83 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईकडून धवल कुलकर्णी, शाम्स मुलाणी व शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शार्दुल ठाकुर व श्रेयस अय्यर यांनी एकेक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : मुंबई 20 षटकांत 6 बाद 205 (पृथ्वी शॉ 63, आदित्य तरे 83, सिद्धेश लाड नाबाद 32, श्रेयस अय्यर 16, अबु नीचम 2/28, रियान पराग 3/30).

आसाम 20 षटकांत 8 बाद 123 (रियान पराग 38, शिवशंकर रॉय 22, अमित सिन्हा 22, धवल कुलकर्णी 2/22, शिवम दुबे 2/3). 

अर्धशतकानंतर पृथ्वीचा बॅट उंचावून जल्लोष

उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी तब्बल आठ महिने क्रिकेटपासून दूर असलेल्या पृथ्वी शॉने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेद्वारे दणक्यात पुनरागमन केले. आसामविरुद्ध सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी साकारल्यानंतर पृथ्वीने बॅट उंचावून जल्लोष केला. याचवेळी त्याने बॅटकडे इशारा करुन यापुढे बॅटनेच उत्तर देईल, असे संकेत दिले. बंदीदरम्यानच्या कालावधीत आपण निराश होतो. पण, प्रशिक्षक, मित्र व घरच्या पाठिंब्यामुळे आपण पुनरागमन करु शकलो आहे. अर्थात, आठ महिन्याच्या कालावधीत जोरदार सराव व सातत्यावर भर दिल्याने टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्याने सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. 

कर्नाटकाची गोव्यावर 35 धावांनी मात

विजयनगर : सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतील अन्य एका सामन्यात बलाढय़ कर्नाटकने गोव्यावर 35 धावांनी विजय संपादन केला. प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने 20 षटकांत 9 बाद 172 धावा केल्या. प्रत्युतरातदाखल खेळताना गोवा संघाचा डाव 19.3 षटकांत 137 धावांवर संपुष्टात आला. या विजयासह कर्नाटकला चार गुण मिळाले आहेत. अ गटात कर्नाटक संघ 20 गुणासह अव्वलस्थानी असून गोवा संघ 8 गुणासह शेवटच्या स्थानावर आहे.

Related posts: