पहिल्या ‘पिंक बॉल’ कसोटीसाठी खेळपट्टी सज्ज

फलंदाज, गोलंदाज सर्वांनाच अनुकूल ठरणार : क्युरेटर मुखर्जी
वृत्तसंस्था/ कोलकाता
भारत व बांगलादेश यांच्यात येथील ईडन गार्डनसवर दुसरी कसोटी होणार असून भारतात होणारी ती पहिली डे-नाईट कसोटी असेल. या सामन्यासाठी मैदान सज्ज करण्यात आले आहे. मात्र अलीकडेच येथे मुसळधार पाऊस झाला असल्याने पिच क्युरेटरला खेळपट्टी सज्ज करण्यासाठी बऱयाच आव्हानांना तोंड द्यावे लागले. या सामन्यास आता तीन दिवसांचा अवधी राहिला असून क्युरेटर सुजन मुखर्जी यांनी चाहत्यांना एक दर्जेदार सामना पहावयास मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
शुक्रवारपासून हा सामना सुरू होत आहे. बुलबुल वादळामुळे अनेक घरे, मोठय़ा इमारती उद्ध्वस्त झाल्याने गेल्या आठवडय़ात पश्चिम बंगालमध्ये बरेच नुकसान झाले आहे. कोलकात्यातही मोठय़ा प्रमाणात मुसळधार पाऊस झाला होता. तसे पाहिल्यास नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी ओलसर वातावरणच असते. कारण यावेळी अधूनमधून पावसाच्या सरी नेहमीच पडत असतात. ‘वादळी पावसामुळे बऱयाच प्रमाणात नुकसान झाले आहे. पण आमच्याकडे पुरेसा वेळ असल्याने आणि वातावरणही स्वच्छ झाल्याने आम्ही खेळपट्टी व मैदान वेळेत सज्ज करू शकलो. खेळपट्टी सध्या उत्तम स्थितीत असून ती सज्ज झाली आहे. गेल्या काही वर्षाप्रमाणे ईडनवर यावेळीही उत्तम दर्जाचे क्रिकेट पहावयास मिळेल आणि तसे व्हावे यासाठी मी मनापासून सर्वोत्तम प्रयत्न करीत आहे,’ असे बंगाल क्रिकेट संघटनेचे क्युरेटर मुखर्जी म्हणाले.
‘या ट्रकवर एक सराव सामना खेळवून त्याची चाचणी घेण्याची इच्छा होती. पण हवामानाच्या अडथळय़ामुळे ते शक्य झाले नाही. स्थानिक सामना तेथे खेळविण्याचा विचार होता. पण वादळ व पाऊस यामुळे सगळा खेळखंडोबा झाल्याने तो अमलात आणता आला नाही. तरीही या खेळपट्टीत प्रत्येकासाठी काहीतरी निश्चितच मिळेल, अशी मला खात्री वाटते. त्यावर हलके गवत ठेवण्यात आले असून चेंडू बाऊन्स होण्याची जास्त शक्यता आहे,’ असेही ते म्हणाले.
इंदोरमधील पहिल्या कसोटीत भारताने बांगलादेशचा एकतर्फी धुव्वा उडवताना एक डाव व 130 धावांनी दणदणीत विजय मिळविला. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱया डे-नाईट कसोटीवर. भारताची ही पहिलीच डे-नाईट कसोटी आहे. दोन दिवसांपूर्वीच गुलाबी चेंडू आणण्यात आले असून मुखर्जी त्यांची या खेळपट्टीवर चाचणी घेतील. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी अद्याप चाचणी घेतलेली नाही. येत्या एकदोन दिवसात मी चाचणी घेईन. पण त्याने फारसा काही फरक पडणार नाही. कसोटीसाठी आतापर्यंत खेंळपट्टी जशी वागली आहे, तशीच ती यावेळीही राहील,’ असेही ते म्हणाले.