|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बदलत्या कथाविश्वाचा विचार करणे आवश्यक

बदलत्या कथाविश्वाचा विचार करणे आवश्यक 

प्रतिनिधी/ पणजी

मराठीच्या मूळधारेत आपली कथा कुठे आहे, त्याची अभिव्यक्ती, कथेची बदलेली भाषा, अवती भवतीचे कथा विश्व कसे पुढे गेले आहे याचा गोमंतकीय कथाकारांनी विचार केल्यास गोमंतकीय कथेचे क्षितीजरंग अधिक विस्तारतील, असे मत समीक्षक तथा साहित्यकि डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी व्यक्त केले.

गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे ‘क्षितीजरंग’ या गोमंतकीय मराठी कथाकारांच्या प्रतिनिधीक कथांचा संग्रह प्रकाशित केला आहे. याचे प्रकाशन गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी डॉ. कोमरपंत विशेष निमंत्रित म्हणून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, उपाध्यक्ष शंभू बांदेकर, कथासंग्रहाचे संपादक विठ्ठल गावस, प्रकाशनासाठी आधारभूत ठरलेले विनोद नाईक व मंडळाचे कार्यवाह तथा प्रकाशक सुहास बेळेकर उपस्थित होते.

डॉ. कोमरपंत यांनी मातीशी नाळ राखून लिहिणाऱया बाळ सप्रे, नारायण महाले, विठ्ठल गावस या कथाकारांचा आवर्जुन उल्लेख केला. यापूर्वीच्या कथा लेखिका म्हणून वासंती नाडकर्णी यांचे एकच नाव पुढे यायचे. परंतु या संग्रहात नऊ लेखिकांच्या कथा आहेत ही आनंददायी बाब आहे, असे नमूद करून डॉ. कोमरपंत यांनी अंधश्रद्धेवर आधारीत गजानन देसाई यांच्या ‘डाग’ या कथेचाही उल्लेख केला.

सभापती पाटणेकर यांनी मराठी भाषा, लेखक कवींना व्यासपीठ देणाऱया या जुन्या  संस्थेने आपली वाटचाल सुरू ठेवल्याबद्दल अभिनंदन करून ज्या मराठी भाषेची गोमंतक साहित्य सेवक मंडळाने सेवा केली त्या भाषेचा  मी ही एक सेवक आहे व चळवळीतील आंदोलक आहे, असे नमूद केले. या मंडळाच्या माध्यमातून नवनवे लेखक कवी उदयाला येत आहेत. याबद्दल समाधान व्यक्त करून विधानसभेच्या पुस्तक संग्रहात या संग्रहाला स्थान देण्याचा आपण प्रयत्न करीत असे पाटणेकर यांनी सांगितले. रमेश वंसकर यांनी स्वागत केले. शंभू भाऊ बांदेकर यांनी सूत्रसंचालन केले. विनोद नाईक, विठ्ठल गावस व डॉ. कोमरपंत यांचा सभापती हस्ते सन्मान करण्यात आला. वंसकर यांनी पाटणेकर यांचा सत्कार केला.

Related posts: