|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अरुणा प्रकल्पावर प्रकल्पग्रस्तांचा जागता पहारा

अरुणा प्रकल्पावर प्रकल्पग्रस्तांचा जागता पहारा 

ठेकेदार कर्मचारी-प्रकल्पग्रस्तांमध्ये बाचाबाची : पोलिसांच्या मदतीने प्रकरणावर पडदा 

वार्ताहर / वैभववाडी:

अरुणा प्रकल्पग्रस्तांनी धरणाच्या ठिकाणी प्रकल्पस्थळी महालक्ष्मी इम्फराप्रोजेक्टच्या कार्यालयाबाहेर ठाण मांडले असून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत, तोपर्यंत प्रकल्पाच्या पाण्याच्या विसर्ग व धरणाचे कोणतेही काम करू नोंदण्याचा इशारा देत धरणाच्या ठिकाणी जागता पहारा सुरू ठेवला आहे.

सोमवारी प्रकल्पग्रस्त आपल्या प्रश्नांसंदर्भात निवेदन देण्यासाठी धरणाच्या ठेकेदारांच्या कार्यालयात गेले असता तेथील कर्मचाऱयांनी प्रकल्पग्रस्तांचे निवेदन घेण्यास नकार दिला. सदर कर्मचाऱयांनी आपल्याला निवेदन घेण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. यावरून प्रकल्पग्रस्त व महालक्ष्मी इन्फ्राप्रोजेक्टचे कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. तेथील कर्मचाऱयांनी भुईबावडा विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. वरवडेकर यांना यासंदर्भात माहिती देऊन पाचारण केले. श्री. वरवडेकर यांनी दोन्ही पार्टीना समजूत काढून कोणीही कायदा हातात घेऊ नये, अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने कार्यवाही करावी लागेल, असे सांगून सामोपचाराने प्रकल्पग्रस्त व ठेकेदारांचे कर्मचारी यांच्यामध्ये सामोपचार घडवून आणल्याने आक्रमक प्रकल्पग्रस्त शांत झाले. 

मोबदला नाही, भूखंड नाही, पुनर्वसनाचा पत्ता नाही. कालवे तयार नसताना प्रकल्पात पाणीसाठा करून अरुणा प्रकल्पग्रस्तांची 130 घरे पाण्याखाली जाऊन सुमारे 500 पेक्षा जादा कुटुंब बेघर झाले आहेत. या संदर्भात नुकसान भरपाई व अन्य मागण्यांच्या सोडवणुकीसाठी प्रकल्पग्रस्तांनी कोकण आयुक्त कार्यालयावर धडक आंदोलन केले. कोकण विभागाचे पुनर्वसन उपआयुक्त अरुण अभंग यांची भेट घेतली. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता तिरमनवार, कोकण पाठबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटेपर्यंत प्रकल्पावर कोणतेही काम होऊ न देण्याचा इशारा देण्यात आला होता. वरील उच्चस्तरीय अधिकाऱयांनी अधीक्षक अभियंता नाईक आणि प्रकल्प अधिकारी राजन डवरी यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधून प्रकल्पग्रस्तांच्या प्रशासनावर तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिलेले आहेत. असे असतांना प्रकल्पग्रस्तांच्या लढय़ाकडे दुर्लक्ष करीत अधिकारी व महालक्ष्मी इनफ्राप्रोजेक्ट कर्मचाऱयांनी धरणातील पाण्याचा विसर्ग धरणाचे पिचिंगचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. याविरोधात प्रकल्पग्रस्तांनी एकवटून पिचिंगचे काम बंद पाडून प्रकल्पस्थळावर जागता पहारा सुरू ठेवला आहे. जोपर्यंत आमच्या प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत हा पहारा असाच सुरू राहील, असे मत सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांनी मांडले आहे. यावेळी माजी सरपंच सुरेश आप्पा नागप, तानाजी कांबळे, अजय नागप, विजय घाडगे, अनंत नागप, परशुराम बुवा नागप, हिरालाल गुरव, अशोक सावंत, राजा कांबळे, गोपिनाथ नागप यांच्यासह सुमारे 50 पेक्षा जादा प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Related posts: