|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आधी निसर्ग कोपला, आता तिलारी प्रशासन

आधी निसर्ग कोपला, आता तिलारी प्रशासन 

तिलारी पाटबंधारे विभागावर शेतकऱयांचा आज मोर्चा : घोटगे, घोटगेवाडी, परमे गावातील शेतकरी आक्रमक

प्रतिनिधी / दोडामार्ग:

निसर्गाचा कोप होउढन झालेल्या पुरस्थितीमूळे दोडामार्ग तालुक्यातील केळी बागायतींची अतोनात हानी झाली. याच्या नुकसानभरपाईची प्रतिक्षा असताना शेतकऱयांनी या संकटातून सावरत नवीन केळी प्लॉट तयार केले. ऑक्टोबर अखेरपर्यंत अशा रोपांना पाणी देणे आवश्यक असते. मात्र, तिलारी प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे बागा करपल्या आहेत. त्यामुळे ‘आधी निसर्ग कोपला, आता तिलारी प्रशासन’ अशाप्रकारची स्थितीचा अनुभव शेतकरी घेत आहेत. यासाठी मंगळवारी सकाळी 11 वा. तिन्ही गावांसह इतर गावातील शेतकऱयांनी पाटबंधारे विभागाविरोधात मोर्चा नेणार असल्याचे शेतकऱयांच्यावतीने प्रगतशील शेतकरी भरत दळवी यांनी सांगितले.

दोडामार्ग तालुक्यात केळी उत्पन्नाखाली घोटगे, घोटगेवाडी, परमे, कोनाळ आदी गावातील क्षेत्र अधिक आहे. तिलारी प्रकल्पाच्या कालव्याद्वारे पुरवठा होणाऱया पाण्यावर केळी बागायती उत्पन्न घेतले जाते. वैशिष्टय़ म्हणजे इथला शेतकरी हा स्थानिक आहे. मित्र एकत्र येऊन सामूहिक तत्वावरही इथे बागायती केली जाते. मागील पूरस्थितीमुळे केळी बागायती अक्षरशः वाहुन गेल्या. यामुळे मोठे नुकसान स्थानिक शेतकरीवर्गाचे झाले. 

आता तिलारी प्रकल्पाने आणली आपत्ती

पहिले झालेले नुकसान हे नैसर्गिक आपत्तीमुळे होते. शिवाय केळीच वाहुन गेल्याने नव्याने प्लॉट साफ करून नवीन रोप खरेदी करून शेतकऱयांनी पुन्हा बागायती केल्या. सदर नवीन बागायतीस ऑक्टोबर अखेरपर्यंत पहिले पाणी देणे आवश्यक होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी येथील शेतकऱयांनी कालव्यातील गाळ काढा व पाणी सोडा, यासाठी निवेदन दिले होते. त्यावेळी दोन दिवसांत सर्व कामे करून पाणी सोडण्याचे आश्वासन अधिकाऱयांनी दिले होते. मात्र, नोव्हेंबर मध्यापर्यंत पाणी सोडले नसल्यामुळे पुन्हा बागायती करपल्या असून याला तिलारी पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे.

या आहेत तीन प्रमुख मागण्या

 आंतराज्य धरण प्रकल्प तिलारीत आहे. मात्र, कारभार सावंतवाडी-चराठे येथून पाहिला जातो. तिलारीत निवेदन घेऊन गेल्यास “साहेबांकडे पाठवतो’’ असे हमखास उत्तर मिळते. कोणताही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे तिलारीतच अधिकारी असावेत. शिवाय तिलारी पाटबंधारे विभागाने केळींची नुकसान भरपाई वनविभागाच्या धोरणानुसार द्यावी. कारण तिथे पिकाच्या वयोमानानुसार दिली जाणारी भरपाई योग्य आहे. तसा निर्णय घ्यावा व ज्या केळी बागायतींचे प्रकल्पाच्या भोंगळ कारभारामुळे नुकसान झाले. त्यामुळे बागायतींच्या संगोपनाची जबाबदारी प्रकल्पानेच घ्यावी, अशा मागण्या घेऊन शेतकरी मोर्चा काढणार आहेत.

Related posts: