|Friday, December 13, 2019
You are here: Home » उद्योग » आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार दबावात

आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार दबावात 

सेन्सेक्स 73 अंकांनी तर निफ्टीत 11 अंकाची घसरण

वृत्तसंस्था/ मुंबई

आठवडय़ाच्या पहिल्या व्यापारी दिवशी सोमवारी शेअर बाजारात दबाव पाहायला मिळाला. बाजाराच्या शेवटी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 73 अंकांनी घसरत 40284 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 11 अंकांनी घसरून 11884 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टीने शेवटच्या क्षणी दिवसभरातील तेजी गमावली. सोमवारी व्यापारादरम्यान छोटय़ा-मध्यम समभागात खरेदीचा प्रभाव पाहायला मिळाला.

सरकारी बँकांतील चांगल्या खरेदीच्या प्रभावामुळे बँक निफ्टीने व्यापारी सत्रामध्ये बाजारात तेजी प्राप्त करून दिली. मात्र, व्यापाराच्या शेवटी बँक निफ्टी 31 हजाराच्या खाली बंद झाला. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 1.43 टक्के आणि खासगी बँक निर्देशांक 0.01 टक्क्यांच्या किंचित वाढीसह बंद झाला. बाजाराच्या सुरुवातीला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 110 अंकांनी वधारून 40465 अंकांवर सुरू झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सुमारे 20 अंकांच्या मजबुतीसह 11915 अंकांवर सुरू झाला.

झी एन्टरटेनमेंट, टाटा स्टील, बीपीसीएल, एल अँड टी, जेएसडब्लू स्टील, पीएनबी, एसबीआय यासारख्या प्रमुख समभागात तेजी होती. तर भारती इफ्राटेल, येस बँक, गेल, रिलायन्स कम्युनिकेशन, बजाज ऑटो, एचडीएफसी यांच्या समभागात घसरण नोंदविण्यात आली. त्याचबरोबर इतर सर्व क्षेत्राचे निर्देशांक तेजीच्या स्तरावर पाहायला मिळाले.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) समभागात 4 टक्क्यांची वाढ झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बीपीसीएलमधील सरकारची पूर्ण हिस्सा विकण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत दिले आहेत. या संकेतामुळे सोमवारी मुंबई शेअर बाजारातील बीपीसीएलचे समभाग मजबूत झाले.

गेल्या आठवडय़ात शेवटच्या दिवशी शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या 30 समभागांचा सेन्सेक्स 70.21 अंकांनी वधारत 40356.69 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 23.35 अंकांची वाढ होऊन 11895.45 अंकांवर बंद झाला होता.    

Related posts: