|Thursday, December 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » पवारांचे मौन, राऊत ठाम

पवारांचे मौन, राऊत ठाम 

सरकार स्थापण्याबाबत सोनियांशी चर्चाच नाही : शरद पवार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

महाराष्ट्रात सरकार स्थापण्यासाठी सुरू असलेल्या महानाटय़ावर सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर पडदा पडेल, असे मानले जात होते; पण सोनिया गांधी यांच्याशी सरकार  स्थापनेबाबत चर्चा झालीच नाही, केवळ सद्यस्थितीतील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली, अशी गुगली टाकत शरद पवारांनी ‘राजकीय’मौन कायम ठेवले. यानंतर लागोलग सेनेचे नेते संजय राऊत यांनी पवारांची भेट घेतली. राज्यात लवकरच शिवसेनेचे सरकार स्थापन होईल, मुख्यमंत्रीही आमच्याच पक्षाचा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, माझी सोनिया गांधी यांच्याबरोबर राज्यातील सद्यस्थितीतील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. यावेळी ए. के. ऍन्टोनीही उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रात सरकार स्थापन करणे आणि शिवसेनेला पाठिंबा देणे याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. केवळ सद्यस्थितीतील राजकीय परिस्थिती आणि पक्षनिहाय संख्याबळावर आम्ही चर्चा केली.

 

राज्यात काँग्रेस आघाडीबरोबर समाजवादी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना व
प्रा. जोगेंद्र कवाडे यांच पिपल्स रिपब्लिकन, शेतकरी कामगार पक्षही आहे. आमच्याबरोबर निवडणूक लढवलेल्या सर्वच पक्षांना आम्ही विश्वासात घेऊ. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेबाबत आम्ही अद्याप कोणत्याही पक्षाबरोबर चर्चा केलेली नाही. यापूर्वी आमच्या सहकाऱयांबरोबरही चर्चा करू. राजकीय घडामोडींवर आमचे लक्ष आहे, असेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले.

पवारांबरोबर राष्ट्रपती राजवटीबाबत चर्चा : संजय राऊत

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सोमवारी रात्री शरद पवारांची भेट घेतली. यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, शरद पवारांबरोबर राज्यातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्यासाठीच्या राजकीय निर्णयाबाबत चर्चा झाली. तसेच शेतकऱयांच्या प्रश्नांवरही आम्ही बोललो. ही भेट राजकीय नव्हती, असा दावाही त्यांनी केला. तसेच महाराष्ट्रात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन होईल. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असा पुन्नरूच्चारही त्यांनी केला.

                           काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींची पुन्हा बैठक 

शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती सोनिया गांधी यांना दिली. पुढील दोन दिवसांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधींची दिल्लीमध्ये बैठक होईल. यामध्ये पुढील निर्णयाबाबत चर्चा होईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ता सुरजेवाला यांनी दिली. 

सत्तास्थापनेचे भाजप-सेनाला विचारा

सत्ता स्थापनेचे काय करायचे ते भाजप-सेना विचारा, असे सांगून यावेळी पवारांनी सेनेला धक्का दिला. शिवसेनेबरोबर किती आमदार आहेत, याबाबत राऊत यांनी मला सांगितले नाही, तुम्ही त्यांच्याशीच बोला. भाजपने राज्यात सत्ता स्थापन करावी का, हा त्याचा प्रश्न आहे. तसेच शिवसेना-भाजप एकत्र येणार की नाही, हे आम्ही कसे सांगणार, ते त्यांनाच विचारा, अशी गुगलीही पवारांनी यावेळी टाकली.

Related posts: