|Thursday, December 12, 2019
You are here: Home » क्रिडा » गौतम गंभीरचा ठपका…धोनीमुळेच माझे शतक हुकले!

गौतम गंभीरचा ठपका…धोनीमुळेच माझे शतक हुकले! 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

2011 आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये गौतम गंभीरने विजय खेचून आणण्यात मोलाचा वाटा उचलला. अर्थात, त्या लढतीत त्याचे शतक अवघ्या 3 धावांनी हुकले होते आणि तीच हुरहूर, तीच खंत त्याने सोमवारी व्यक्त करताना याचा ठपका महेंद्रसिंग धोनीवर लावला. श्रीलंकेविरुद्धची ती लढत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाली होती.

त्या अंतिम लढतीत 275 धावांचा पाठलाग करताना विरेंद्र सेहवाग व सचिन तेंडुलकर स्वस्तात बाद झाल्यानंतर भारताची 2 बाद 31 अशी स्थिती झाली आणि त्यावेळी गौतम गंभीर क्रीझवर उतरला. गंभीरने यावेळी धोनीसमवेत तिसऱया गडय़ासाठी 109 धावांची भागीदारी साकारली. गंभीर पुढे थिसारा परेराच्या डावातील 42 व्या षटकात 97 धावांवर बाद झाला. दरम्यान, 97 धावांवर असतानाच धोनीने गंभीरला तो शतकाच्या समीप आल्याची आठवण करुन दिली होती आणि यामुळे दडपणाखाली आपण बाद झाल्याचा गंभीरचा आरोप आहे.

‘97 धावांवर असताना काय घडले, हा प्रश्न मला यापूर्वीही अनेकदा विचारण्यात आला. वास्तविक, 97 धावांपर्यंत पोहोचेतोवर माझ्या मनात शतकाचा विचारही नव्हता. मी फक्त संघाला 275 धावांचा पाठलाग कसा यशस्वीरित्या करवून देता येईल, यावर लक्ष केंद्रित करुन होतो. पण, याचवेळी धोनी माझ्याकडे आला आणि त्याने शतकासाठी मला तीनच धावा हव्या आहेत, याची आठवण करुन दिली. त्यानंतर मी सावध फलंदाजीवर भर दिला आणि त्यातूनच माझ्याकडून चुकीचा फटका खेळला गेला’, असा ठपका येथे गंभीरने लगावला.

‘97 धावांवर बाद होऊन परतत असताना ड्रेसिंगरुमकडे परतत असताना मी स्वतःलाच सांगत होतो की, पूर्ण आयुष्यभर या 3 धावा मला सतावत ठेवणार आहेत. अगदी आजही मला लोक विचारतात की, त्यावेळी मला त्या तीन धावा का जमवता आल्या नाहीत. वैयक्तिक धावा, वैयक्तिक माईलस्टोन विचाराच्या आड आले की, सारे लक्ष तिथे राहते. त्यावेळी मी 97 धावांवर आहे, याची कल्पना नसती तर लंकेचे धावांचे लक्ष्य समोर ठेवूनच मी खेळत राहिलो असतो आणि कदाचित शतकही सहज होऊन गेले असते’, याचाही या डावखुऱया फलंदाजाने उल्लेख केला.

त्या लढतीत गंभीर बाद झाला, त्यावेळी भारताला 52 चेंडूत 52 धावांची गरज होती. नंतर धोनी 91 धावांवर नाबाद राहिला तर युवराज सिंगने 28 धावांचे योगदान दिले. भारताने त्यावेळी श्रीलंकेला मात देत 28 वर्षांनंतर आयसीसी विश्वचषकावर आपली मोहोर उमटवली होती.

Related posts: