भारतीय महिलांचा विजयी चौकार

चौथ्या टी-20 सामन्यात विंडीजवर 5 धावांनी विजय, मालिकेत 4-0 ने आघाडी
वृत्तसंस्था/ गयाना
भारतीय महिला क्रिकेट संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना सलग चौथ्या सामन्यात यजमान विंडीजवर विजय संपादन केला. पावसाच्या व्यत्ययामुळे 9 षटकांच्या झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 50 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला 5 बाद 45 धावापर्यंत मजल मारता आली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या रोमांचक सामन्यात भारतीय महिलांनी अवघ्या 5 धावांनी विजय मिळवला. आता, उभय संघातील पाचवा व शेवटचा सामना दि. 21 रोजी होईल. सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱया विंडीजच्या मॅथ्यूजला सामनावीर घोषित करण्यात आले.
पावसाचा व्यत्यय आल्यामुळे हा सामना प्रत्येकी 9 षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. 9 षटकाच्या या सामन्यात फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात भारताचे 7 गडी बाद झाले. भारताकडून पूजा वस्त्रकारने सर्वाधिक 10 धावा केल्या. इतर फलंदाजांनी मात्र निराशा केली. विंडीजच्या हॅले मॅथ्यूजने 13 धावांत 3 गडी बाद करत भारतीय फलंदाजीला चांगलेच खिंडार पाडले. फ्लेचर आणि ग्रिमंड या दोघींनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
विंडीजच्या महिलांचे सपशेल लोटांगण
प्रत्युतरातदाखल खेळताना विजयासाठी मिळालेल्या 51 धावांचा पाठलाग करताना भारताच्या भेदक माऱयासमोर यजमान संघाला 5 बाद 45 धावापर्यंत मजल मारता आली. मॅथ्यूज (11), हेन्री (11) आणि मॅकलीन (10) यांनी थोडाफार प्रतिकार केला पण संघाला त्या विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. शेवटच्या षटकात विंडीजला विजयासाठी 13 धावांची आवश्यकता असताना अनुजा पाटीलने दोन बळी मिळवत भारताला विजय मिळवून दिला.
या विजयासह भारतीय महिला संघाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 4-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. 21 रोजी होणारा पाचवा व अखेरचा सामना जिंकत भारतीय महिलांचा व्हाईटवॉशचा प्रयत्न असेल.
संक्षिप्त धावफलक : भारतीय महिला 9 षटकांत 7 बाद 50 (शेफाली वर्मा 7, जेमिमा रॉड्रिग्ज 6, वेदा कृष्णमुर्ती 5, पूजा वस्त्राकार 10, मॅथ्यूज 3/13, फ्लेचर 2/2, ग्रिमंड 2/10).
विंडीज महिला 9 षटकांत 5 बाद 45 (मॅथ्यूज 11, हेन्री 11, मॅकलिन 10, अनुजा पाटील 2/8, दीप्ती शर्मा 1/8).