|Monday, December 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » सियाचीनमध्ये हिमस्खलन, 4 सैनिक हुतात्मा

सियाचीनमध्ये हिमस्खलन, 4 सैनिक हुतात्मा 

श्रीनगर / वृत्तसंस्था

जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱया सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात 4 सैनिक हुतात्मा झाले आहेत. तसेच या दुर्घटनेत 2 नागरिकांनाही जीव गमवावा लागला आहे. या अत्यंत दुर्गम क्षेत्रात सोमवारी दुपारी हिमस्खलन झाले असून गस्तपथकाचे 8 सैनिक ढिगाऱयाखाली अडकून पडले होते. सैनिकांना वाचविण्यासाठी सैन्याने तत्काळ बचावमोहीम सुरू केली होती. अत्यंत प्रतिकूल स्थितीत राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेत सैनिकांना ढिगाऱयाखालून बाहेर काढण्यात आले होते.

या सैनिकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सैन्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. गंभीर प्रकृती झालेल्या 6 सैनिकांवर उपचार सुरू करण्यात आले होते. यातील 4 सैनिकांना हौतात्म्य आले आहे. तर सामग्री वाहून नेणाऱया दोन नागरिकांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दोन सैनिकांची प्रकृती अद्याप गंभीर असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास सियाचीनमध्ये हिमस्खलन झाले होते. या हिमस्खलनाची माहिती मिळताच सैन्याने सैनिकांच्या बचावाकरता एक मोठी शोध मोहीम हाती घेतली होती.

काराकोरम क्षेत्रात सुमारे 20 हजार फुटांच्या उंचीवर असलेले सियाचीन ग्लेशियर जगातील सर्वात उंचीवरील सैन्यक्षेत्र मानले जाते. तेथे सैनिकांना फ्रॉस्टबाईट (अत्याधिक थंडीमुळे शरीर बधीर होणे) आणि वेगवान वाऱयांना तोंड द्यावे लागले. ग्लेशियरवर हिवाळय़ात हिमस्खलनाच्या घटनांचे प्रमाण अधिक असते. तसेच तेथील तापमान उणे 60 अंश सेल्सिअसच्या खाली पोहोचते. यापूर्वीही अनेकदा सियाचीनमध्ये हिमस्खलन झाले असून अनेक सैनिकांना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. सियाचीन क्षेत्र भारत-पाक नियंत्रण रेषेनजीक असून याचे क्षेत्रफळ सुमारे 78 किलोमीटर इतके आहे.

Related posts: